shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंग्रज खेळाडू करत आहेत सोशल मिडीयाचा गैरउपयोग..?



                      ईमेल, व्हॉटसप, इंस्टाग्राम, ट्वीटर, स्काईप, झुम, टेलिग्राम व अशा इतर अनेक झटपट संपर्क करून देणाऱ्या सोशल मिडीया म्हणजेच समाज माध्यमांमुळे जग हजारो मैल जवळ आल्यासारखे वाटत आहे. वरील सर्व संपर्क माध्यमांमुळे आपले व्यवहार आपल्याला क्षणात करता येतात. जवळच्या व्यक्तीशी त्वरीत संपर्क करता येतो. या व इतर अनेक फायद्याच्या बाबी असताना याच सोशल मिडीयाचा गैर उपयोग करून काही विघ्न संतोषी लोक समाजात तेढ निर्माण करतात. आपल्या उलटसुलट मत मांडण्याच्या चुकीच्या प्रथेमुळे अनेक गैरसमजही निर्माण होतात. तर काही जण आपल्या भावना पुढील दुष्परीणामांचा विचार न करता बिनधास्ततपणे मांडून मोकळे होतात व प्रकरण अंगलट आल्यावर, त्यावेळी तो व्यक्ती अज्ञान होता, गैरसमजूतीतून आपण तसं म्हंटलं होतो, आता मी परिपक्व झालो आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. असे बुळबुळीत स्पष्टीकरण देऊन आपली चुक झाकण्याचा प्रयत्न करतात. 

सध्या असेच काही उद्योग इंग्लिश क्रिकेटपटू करताना दिसत असून आपल्या पापावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नऊ वर्षापूर्वी म्हणजे सन २०१२ मध्ये वर्णभेदाला खतपाणी घालणारे व लिंगभेदाला चिथावणी देणारे ट्वीट इंग्लंडकडून मागच्याच आठवड्यात कसोटी पदार्पण करणाऱ्या ऑली रॉबिनसनने केले होते. मात्र त्याचे पडदास रॉबिनसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटलावर आल्या आल्या उमटायला वेळ लागला नाही. नेटकरी मंडळींनी रॉबिनसनची चुक पुराव्या सकट सोशल मिडीयावर जशीच्या तशी झळकविल्या नंतर इंग्लिश क्रिकेट बोर्डाने तातडीने कारवाई करत रॉबिनसनला पुढील चौकशी पुर्ण होई पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निलंबित केले. रॉबिनसनने जी "चुक" केली असं तो आज म्हणतो परंतु वास्तविक ते त्याचं "खरं" मतं आहे. आज त्याची कारकिर्द संकटात आल्यामुळे तो स्वतःच्या बचावासाठी त्या वेळी तो "अल्पवयीन " असल्याचा कांगावा करत आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या विद्यामान खेळाडूंपासून पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या पर्यंत रॉबिनसनला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.  हि बाब नक्कीच निंदनीय अशीच आहे.

या प्रकारच्या चुका करणारा रॉबिनसन हा काही पहिला इंग्रज क्रिकेटपटू नाही. इंग्रजांनी त्यांच्या तोडफोड नितीमुळे भारतावर दिडशे वर्ष राज्य केले. याच प्रकारचे कुटील डाव इंग्लंडचे आजी माजी क्रिकेटपटू मोठया शिताफीने खेळत आहेत. तसेच प्रकरण अंगलट येताच बेतमालूम पणे आपले हात झटकून मोकळे होतात.


आयपीएल ही बीसीसीआय संचलित टि-२० लिग स्पर्धा जगभर जगमान्य झाली. आयपीएलमध्ये खेळाडूंना भरपूर पैसा व अमाप लोकप्रियता मिळते. शिवाय भारतीय खेळपट्टयांवर खेळण्याचा अनुभवही मिळतो. इंग्लिश क्रिकेट बोर्डानेही आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यास परवानगी दिली. आजमितीला कमीत कमी पंधरा इंग्रज खेळाडू आयपीएल खेळतात. त्याचा लाभ त्यांना झाल्याचे सर्वांना माहित आहेच. परंतु पैसा, लोकप्रियता व भारतात खेळण्याचा मिळत असलेला फुकटचा अनुभव इंग्रज सहजा सहजी घेतील तर तर ते इंग्रज कसले ?
                              
इंग्लंडचा सफेद चेंडूच्या खेळाचा कर्णधार ओएन मॉर्गन आयपीएलमध्ये केकेआर कडून तर जोस बटलर हा राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहेत. हे दोघेजण आपसात ट्वीट करतात. त्यांच्या काही ट्वीट्स मध्ये सध्याच्या भारतीय खेळाडूंना " सर " असे उपरोधीकपणे संबोधताना आढळले आहे. सध्या ईसीबी या प्रकरणाची चौकशी करत असून बटलर व मॉर्गन यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
                             
इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा व कसोटी खेळणारा जेम्स अँडरसननेही समलैंगीकते विषयी असेच अकलेचे तारे दहा वर्षापूर्वी तोडले होते. आता तो सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.
                              
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसननेही अनेक वेळा भारतीय खेळाडू व संघाविषयी उलट सुलट मतं ट्वीटर वर मांडले आहेत. पिटरसनला भारताचे पंतप्रधान सुद्धा चांगल्या प्रकारे इज्जत देतात. परंतु गोऱ्या कातडीचे लोक आपल्या गुणावर गेल्यावाचून राहात नाहीत.
                             
या सगळ्यावर कडी केली आहे ती आणखी एक माजी कर्णधार मायकेल वॉन याने. नेहमी भारतीय संघाविषयी उलट सुलट मत मांडतो. भारतीय खेळाडूंमध्ये आपसात वाद होतील असे चिथावणीखोर वक्तव्य करतो. ऑस्ट्रेलियात भारत ४-० हरेल असे भाकीत याच पठ्ठयाने केले होते. भारताने कांगारूंना चित केल्यानंतर भारतीय संघाचे कौतुक करण्याऐवजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची पाठराखण हे वॉन महाशय ट्वीटर मधून करत होते. इंग्लिश संघ भारत दौऱ्यात ३-१ असे हरला. ती मालिका चालू असताना हा बहाद्दर इंग्लिश संघाच्या चुका सांगण्याऐवजी खेळपट्टीला दोष द्यायचा. आता भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून भारतीय संघाला कमी लेखण्याची कामगिरी हे वॉन साहेब इमाने इतबारे करत आहेत.
                          
वसाहतवादी इंग्रजांनी भारतात राज्य करत असताना अनेक ठिकाणी " डॉग्ज अँड इंडियन्स आर नॉट अलाऊड " असे बोर्ड (पाटया ) लावलेल्या होत्या. त्यांचे कायदे समतोल नसून त्यांच्या विशेष तत्वांचे रक्षण करण्यासाठीच त्याचा उपयोग केला जातो.  त्यांचे खेळाडू जेंव्हा चुका करतात तेंव्हाच त्यांना लगाम का घातला जात नाही. प्रकरण अंगलट आल्यावर स्वतःची कातडी वाचविण्याचा ते जिवाच्या अकांताने प्रयन्त करतात. ही गोष्ट येथे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close