डॉ.निकम साहेब पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आले असता रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ढोल-ताशे वाजवून व फटाके फोडून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. बातमी वाचत असतांना सहजच एक विचार मनात आला. वर्तमानपत्रातले अशा स्वरुपाचे मथडे ही दैनंदिन बाब आहे त्यात काही नवीन नाही. पण नवीन नसली तरी ही बातमी मात्र विशेष आहे आणि हेच या बातमीचं वैशिष्ट्य आहे.
कारण हल्ली, कधी आपला वरीष्ठ अधिकारी सेवानिवृत्त वा बदली होवून जातो आणि आपण कधी सुटकेचा निःश्वास टाकतो (काही विशिष्ट हेतूने) अशीच परिस्थिती साधारणपणे (काही सन्माननीय अपवाद वगळता) जवळजवळ सर्वच कार्यालयांमध्ये दिसून येते. डॉ. शामसुंदरजी निकम हे या मानसिकतेचे सन्माननीय अपवाद आहेत आणि म्हणूनच ही बातमी विशेष आहे. कारण ' गेले एकदाचे ' असं म्हणून सुटकेचा निःश्वास टाकण्याऐवजी.. पुन्हा आले म्हणून ढोलताशांच्या गजरात अगदी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यासाठी आणि आनंद व्यक्त करण्यासाठी जेव्हा सहकारी पुढे येतात तेव्हा तो परत आलेला व्यक्ती अधिकारी म्हणून आलेला नसतो तर तो त्या कुटुंबातील सर्वांना सांभाळून घेणारा,त्यांचं मनोबल उंचावणारा, त्याच अधिकाराने रागावणारा, फटकारणारा आणि प्रसंगी आपला सहकारी म्हणून जवळही घेणारा एक कर्ता पुरुष असतो. म्हणून लोक अशा व्यक्तिंचे मनापासून स्वागत करीत असतात.
ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेचं व्रत स्विकारलेलं आहे (त्यांच्यावर कुणी लादलेलं नाही) अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं अनेकदा पहायला वाचायला मिळते. एखादा हाडाचा शिक्षक, मुख्याध्यापक, तहसीलदार, एखादा जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी किंवा एखादा बँकेतील शाखा व्यवस्थापक बदली होवून गेलात तर त्यांची बदली रद्द करावी व त्यांना त्याच ठिकाणी सेवेत ठेवावे यासाठी जनसमुहाने मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्याची किंवा एखादा अधिकारी सेवानिवृत्त होत असल्यास त्यांचा सेवाकार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठी आंदोलने केल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. असे अधिकारी समाजाला हवे असतात पण दुर्दैवाने अशी उदाहरणे बोटावर मोजण्या ईतकीच आहेत आणि डॉ. निकम साहेब हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. म्हणून ही बातमी विशिष्ट आहे असं मी सुरुवातीलाच म्हटलं. ज्या गोष्टी सर्रास घडतांना दिसतात त्याचं अप्रूप वाटत नसते. ज्या गोष्टीची वानवा असते तीच जास्त हवीहवीशी वाटत असते.
तसं कुठलंच क्षेत्र कमी महत्त्वाचं नसतं. अगदी चपलेचा तुटलेला पट्टा शिवून देणारा कारागीर असो वा डिसकनेक्ट झालेला विद्युत प्रवाह सुरु करुन देणारा तंत्रज्ञ असो प्रत्येकाचेच काम महत्त्वाचे, पण वैद्यकीय क्षेत्र थेट जगण्या-मरण्याशीच संबंधित असल्याने ते निश्चितच सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचं असते आणि म्हणूनच त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्यही जास्त महत्त्वाचे असते. कारण एरव्ही डॉक्टरांना धक्कबुक्की करणाऱ्यांवरही तशी वेळ आली की डॉक्टरांच्या रुपात त्यांना देव दिसू लागतो. आणि ते खरंही आहे. शेवटी उपचार करणाराच देवासमान असतो.
कुठलीही पदवी घेतांना पदवीदान समारंभात कुलपतींकडून धारकांना एक शपथ दिली जाते, "की मी ज्या क्षेत्रात, व्यवसायात माझी सेवा देणार आहे त्यात मी माझी व्यावसायिक नितीमत्तेची (Professional ethics) जोपासना करुन माझे वैयक्तिक हीत किंवा स्वार्थ समाजहीताच्या आड येवू न देता निःस्वार्थीपणे सेवा देईन अशी मी आपणासमोर शपथ घेत आहे". अर्थात या शपथांचं नंतर काय होतं हे मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही.(सांप्रत परिस्थितीत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी दोन ते तीन कोटी रुपये डोनेशन च्या स्वरूपात द्यावे लागत असतील किंवा प्राध्यापक होण्यासाठी पन्नास ते साठ लाख रुपये संस्था चालकांना द्यावे लागत असतील तर डॉक्टर किंवा प्राध्यापक झाल्यानंतर त्याचे ठिकाणी किती सेवाभाव शिल्लक राहील हाच मोठा प्रश्न आहे?)
त्यामुळे हल्ली व्यावसायिक नितीमत्ता वगैरे या गोष्टी ईसापनितीतील गोष्टी शोभाव्यात अशा मनोरंजक झाल्याचे दिसते. ती केवळ एक औपचारिकताच राहिली आहे का? हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय झालेला आहे. म्हणून एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी ही तत्वं, व्यावसायिक नितीमत्ता आणि समाजहीत जोपासून आपली सेवा देत असेल तर निश्चितच ती व्यक्ती किंवा तो अधिकारी आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अशा स्वयंस्फूर्त स्वागत सोहळाने भारावून जातो. या अशा कौतुकाने वा सत्काराने काम करण्याची नवी उर्मी तर येतेच पण एक जबाबदारी सुद्धा येत असते. कारण सत्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीला हे चांगलेच माहीत असते की, "सत्कार हा कुण्या व्यक्तिचा होत नसतो तर त्या व्यक्तीच्या ठायी वास करत असलेल्या गुणांचा तो सत्कार असतो. " आणि हीच जाणीव त्या व्यक्तीला वेळोवेळी अधिक जबाबदारीने आणि निःस्पृहपणे काम करण्यासाठी बळ देत असते.
या अर्थाने डॉ. शामसुंदरजी निकम एक सन्माननीय अपवाद आहेत. यांचे कार्य, त्यांची सहकाऱ्यांकडून काम करुन घेण्याची विलक्षण हातोटी, तसेच त्यांचा शांत आणि निगर्वी स्वभाव निर्विवादपणे कौतुकास्पद, अभिनंदणीय आणि इतरांनी आदर्श घ्यावा असाच आहे. आणि म्हणूनच शासनदरबारी त्यांच्या कार्याची दखल घेऊन नियत सेवानिवृत्तीनंतरही त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने 'जिल्हा शल्य चिकित्सक' या पदावर पुन्हा दुसऱ्यांदा नियुक्त करणे हाच त्यांच्या कार्याचा सर्वात मोठा गौरव आहे.
जिल्ह्याचे प्रमुख म्हणून प्रशासकीय कामाचा प्रचंड व्याप आणि त्यातच गेल्या दीड वर्षापासून कोरोना सारख्या महामारीने आरोग्य व्यवस्थेवर पडलेला अतिरिक्त ताण आला. अनेक पातळ्यांवर काम करत असतांना अनेक समस्या उभ्या राहिल्या, अनेक वादळे आलीत, त्यातली काही कपातलीच ठरली, परंतू उपजतच अंगी असलेल्या कौशल्याने अगणित समस्यांना तोंड देत, Maximum output by using minimum resources हे तत्व अवलंबून कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपल्या जवळ किमान उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीत जास्तीत जास्त परिणामकारकता कशी साध्य करता येईल यासाठी अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करुन आणि Work is worship या उक्तीनुसार न्यायाने आणि आत्मविश्वासाने डॉ. निकम साहेब काम करत राहीले.
स्वाभाविकच अशा साथरोगात डॉक्टर म्हणून काम करीत असतांना स्वतःही कोरोना संक्रमीत झाले. एकदा संक्रमीत झाल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्यास अनेक गुंतागुंतीचे आजार निर्माण होतात ही वास्तविकता असून सुद्धा जीवाची पर्वा न करता पुन्हा नव्या जोमाने सेवेत हजर झाले. यासाठी माणसामधे सर्वात महत्त्वाचा गुण असावा लागतो, तो म्हणजे आपल्या कामाप्रती असलेली आपली श्रद्धा, भक्ती, निष्ठा आणि वाहून घेण्याची.. समर्पणवृत्ती.!!
अमरावतीला विदर्भाची सामाजिक, शैक्षणिक
आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. शाळेचा उंबराही न ओलांडणाऱ्या परंतू अमरावती विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञानगंगा ज्यांच्या नावाने वाहते आहे ते "सेवा परमो धर्मः" हे तत्वज्ञान जगलेले, बापहो! देव मंदिरात न्हाई, ज्यांनी गोरगरीबांमधे देव पहायला शिकवला, मानवता हाच खरा धर्म, असे सांगणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेच्या उद्धारासाठी ग्रामगीतेच्या माध्यमातून पुरोगामित्वाची चळवळ निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि जो बहुजन समाज पिढ्यानपिढ्या अडाणी, अशिक्षित आणि मानसिक गुलामगीरीतच जन्मला, वाढला आणि संपला. त्या मृतवत झालेल्या आणि आत्मसन्मान गमावून बसलेल्या समाजातील पुढच्या पिढ्यांना शिक्षणाची नवसंजीवनी देणारे शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. या महान विभूती या मातीत जन्माला आल्यात आणि सुदैवाने आम्हीही त्याच मातीत जन्मलो. भाऊसाहेबांनीच उभारलेल्या शाळा-महाविद्यालयांत शिकलो.
या महापुरुषांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेचा महान आदर्श घालून दिलेला आहे.तो पुढे घेऊन जाणे हे आपण सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. तोच वसा पुढे घेऊन डॉ. शामसुंदरजी निकम यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत.त्यांच्या रुपाने अमरावती जिल्ह्याला एक उत्कृष्ट प्रशासक, कुशल नेतृत्व आणि मानवतावादी विचारसरणी असलेले जिल्हा शल्य चिकित्सक लाभले आहेत. त्यांच्या कर्तव्य निष्ठेला प्रणाम करुन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून अशीच आरोग्य सेवा अहर्निश..निरंतर..घडत राहो आणि यासाठी त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करतो.
प्राचार्य डॉ. उद्धव जाने
अमरावती
९४२१७४०८८४

