प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा : (दि .१८ ) :माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे एकहाती नेतृत्व व जगताप यांचे वरील शहरवासियांचा असलेला अगाध व गाढा विश्वासामुळेच गेल्या साडेचार वर्षात तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी आणून विकासकामे करू शकलो असे मत करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी व्यक्त केले .
![]() |
| वैभव जगताप |
याविषयी अधिक माहिती देताना नगराध्यक्ष जगताप यांनी सांगीतले कि, सन १९९५ पासून नगरपरीषद जगताप गटाच्या ताब्यात आहे . शहरवासियांसाठी जनसुविधा देणेच्या दृष्टीने वीज, पाणी, रस्ते, आरोग्यासाठी स्वच्छता या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करून सेवा देत असल्यामुळेच व जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळेच शहरातील जनता गेली २५ वर्षे जगताप गटाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे .
पूर्वी नामदेवराव जगताप यांनी शहरासाठी सीनेवरून पाणीपुरवठा योजना राबविली होती . नंतरच्या काळात शहराचा वाढता विस्तार व पाणीटंचाईचा विचार करता तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांनी 'क 'वर्ग नगरपरीषद असताता खास बाब म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, नगरविकास मंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब व अर्थमंत्री बँ . रामराव आदिक यांचेकडून शहरासाठी उजनी धरणावरून दहिगाव येथून पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली . नंतर शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून २००९ साली तब्बल १३ कोटी रुपयांची विस्तारीत पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली .
संपूर्ण महाराष्टू पाणीटंचाईने होरपळत असताना, लातूर सारख्या ठिकाणी रेल्वेने पाणीपुरवठा केला जात असताना, सोलापूर - अक्कलकोटला १५ दिवसा आड पाणी पुरवठा असताना करमाळा शहरास मात्र स्वच्छ, सुरळीत व अखंडीत पाणीपुरवठा सुरु आहे . शहर स्वच्छतेकडे आम्ही विशेष लक्ष नियमितपणे देत असल्यामुळेच स्वच्छता अभियानामधे पालिकेला राष्ट्रीय पातळी वरील पारितोषिके मिळालेली आहेत .
जयवंतराव जगताप यांनी शहरात कधीही दहशत, गुंडगिरी अथवा जातीयतेला थारा न दिल्यामुळे शहराचे सामाजीक स्वास्थ्य व सक्षम बाजारपेठ टिकून राहिली आहे . शहराच्या नगराध्यक्ष पदी माजी आ.जगताप यांनी आत्ता पर्यंत माझेसह युसूफ नालबंद, कै डि.पी . जगताप, कै .सुशिला आगलावे, सौ . सुनीता वाशिंबेकर, शौकत नालबंद, ज्ञानेश्वर मोरे,अमोद संचेती, सौ .विद्या चिवटे, सौ पुष्पा फंड, दिपक ओहोळ तर उपनगराध्यक्ष पदी हनिफ शेख, रतनचंद दोशी, अँड कमलाकर वीर, कै .राजकुमार परदेशी, दादासाहेब सावंत, नारायण जगताप, सत्यभामा बनसुडे , श्रीनिवास कांबळे , प्रशांत ढाळे,अहमद कुरेशी यांचेसह विविध जातीधर्माच्या लोकांना नगरसेवक व शिक्षण मंडळावर काम करणेची संधी दिली .
गेली २ वर्षे कोरोनाच्या काळात नगरपरीषदेने जन जागृतीसह सुविधा देणेचे काम प्रभावीपणे केले . मुख्याधिकारी वीणा पवार यांचेसह सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान असो अथवा शहर वासियांसाठी नवीन अत्याधुनिक ओटे युक्त भाजी मंडई, शॉपिंग सेंटर्स, सभागृहे,मच्छि मार्केट, बगीचे, स्मशान भूमीची कामे तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचेसह इतर राष्ट्रपुरुषांच्या पुतळा परीसराचे सुशोभिकरण पूर्ण झालेली आहेत . शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरु असून डांबरीकरण, सिमेंट कॉक्रिट रस्ते, गल्ली बोळांमधे पेव्हर ब्लॉक्स टाकून संपूर्ण शहर चकाचक करणे साठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून यापैकी ९ कोटी रुपये प्रत्यक्ष प्राप्त होवून कामे प्रगती पथावर असल्याचे नगराध्यक्ष जगताप यांनी सांगीतले .
याकामी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे हि नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी सांगीतले . आगामी काळात माजी आ जगताप यांचे मार्गदर्शनानुसार शहरवासियांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभा करणे साठी पालिकेच्या वतीने सर्वोतपरी मदत केली जात असून लवकरात पुतळा उभारणीचा मानस असल्याचेही नगराध्यक्ष जगताप यांनी सांगीतले .


