जगात गेल्या दीड वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोनाचा विषाणू हा दर काही महिन्यांनी नवा अवतार धारण करतो. त्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे, हे समजणारी प्राथमिक लक्षणंही बदलत गेल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस (Delta Plus) हा नवा अवतार आता जगभरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असताना त्याची लक्षणंही बदलल्याचं याविषयीच्या अभ्यासगट ‘झो’नं (ZOE) म्हटलंय. नागरिकांची या अहवालाने चिंता वाढली असून कोरोनाचा हा व्हेरियंट भारतात डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत .
कोरोनाची लक्षणं आणि लसीकरण याचा अभ्यास करणाऱ्या झो या गटातील एक अभ्यासक प्रा. स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा प्लसची लागण झाल्याची काही समान लक्षणं रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. डोकं दुखणं, घशात खवखवणं आणि नाक वाहणं ही डेल्टा प्लसची सर्वांमध्ये आढळून येणारी लक्षणं असल्याचं दिसून आलं आहे तर ब्रिटनमध्ये अनेकांना अचानक हुडहुडी भरत असल्याचा अनुभवदेखील आला आहे. कोरोनाच्या विषाणूचा अवतार बदलेल तशी जुनी लक्षणं कमी होत जातात आणि नव्या लक्षणांमध्ये भर पडते, असं देखील प्रा. स्पेक्टर यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे.
कोरोनाच्या या नव्या अवताराचा सर्वाधिक फटका लसीकरण न झालेल्या नागरिकांना बसत असल्याचं आतापर्यंतच्या अनुभवातून समोर आलं आहे. विशेषतः लसीकरण झालेल्या आणि पन्नाशीच्या आतील एकाही नागरिकाला ब्रिटनमध्ये डेल्टा प्लसची लागण झालेली नाही. लसीकरण पूर्ण झालेल्यांना लागण होण्याचं प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण होणे, हाच सध्या तरी डेल्टा प्लसला रोखण्याचा उत्तरम मार्ग असल्याचं सांगितलं जात आहे.
➡️दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार) खडांबे खुर्द


