गौंडरे येथे अधिकाऱ्यांकडून पहाणी..!!
करमाळा । प्रतिनिधी(सुर्यकांत होनप) :- करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी मोफत मिळणारे धान्य वाटप न करता काळा बाजार केला म्हणून दिनांक २९/५/२०२१ रोजी गावातील रेशनकार्ड धारक यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे ईमेल द्वारे तक्रार केली होती. त्यावरून आज दि.२/६/२०२१ रोजी निवासी नायब तहसीलदार श्री मोरे व पुरवठा निरीक्षक ठाकर भाऊसाहेब यांनी चौकशी केली असता धान्य दुकानात माल नव्हता, तर तो बेकायदेशीर धान्य साठा दुकानदार यांच्या घरात सापडला आहे.
तपासणी केली असता अनाधिकृत रित्या गहू ३३ क्विंटल व १०.४० क्विंटल तांदूळ एवढा बेकायदेशीर धान्य साठा आढळून आला आहे. कोरोना महामारीत केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरण केले आहे. परंतु दुकानदार यांनी निम्माच माल वाटप केला होता, व पावत्या संपूर्ण मालाच्या सोडविल्या आहेत. गोरगरीब जनतेसाठी मोफत आलेला माल न वाटप करता दुकानदार हा गहू प्रती गोणी ७०० रू किमतीने काळा बाजार करून विक्री करत होता व करीत आहे.
कृपया तपास अधिकारी यांनी दुकानदार यास पाठीशी घालू नये, गोरगरिबांचा घास काढून घेणाऱ्या भ्रष्ट दुकानदार याच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गौंडरे गावातील रेशन कार्ड धारक यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय करमाळा समोर उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा ज्ञानेश्वर बिचितकर, अक्षय हनपुडे, माधव हानपुडे, आण्णा सपकाळ, जाईबाई सपकाळ, योगेश हणपुडे यांनी दिला आहे.
तहसीलदार समीर माने यांच्या आदेशाने गौंडरे येथील स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केलेले आहे. रेशनकार्डधारकांना पावत्या देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दुकान आणि घर एकाच ठिकाणी आहे. येथील धान्याची दोन ठिकाणी तपासणी केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे धान्य वाटप राहिले होते. राहिलेले धान्य लवकरच वाटप होईल. स्वस्त धान्याचा काळाबाजार करणे कायद्याने गुन्हा आहे तक्रारदारकाच्या तक्रारीनुसार काळाबाजारात धान्याबाबत चौकशी केले आहे.
अनिल ठाकर, पुरवठा निरीक्षक करमाळा
पुरवठा निरीक्षक हे रेशन दुकानदार यास पाठीशी घालत आहेत, कोरोना व लॉक डाऊन च्या काळात गोरगरीब जनतेसाठी केंद्र व राज्य सरकारने मे महिन्यात मोफत धान्य वाटप करणे साठी धान्य साठा उपलब्ध करून देण्यात आलेला होता.परंतु दुकानदार याने रेशन कार्ड धारक यांना धान्य वाटप न करता धान्याचा काळा बाजार करून गहू प्रती गोणी ७०० रू किमतीने विक्री करत आहे.
याचा पुरावा पुरवठा निरीक्षक यांना दिला आहे. असे असूनही त्यांनी माल शिल्लक राहिला आहे. असे म्हणणे म्हणजे निव्वळ दुकानदार यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे.
याशिवाय माल वाटप न करता दुकानदार यांनी अगोदरच पावत्या काढल्या आहेत. मग मला धान्य का दिले नाही ? तसेच धान्य दुकान व घर वेगळे आहे.याची माहिती पुरवठा निरीक्षक यांना आहे, मग दुकान रिकामे असताना घरात धान्य ठेवण्याची गरज काय आहे आणि असे कायद्याने मान्य आहे का?.तसेच
पुरवठा निरीक्षक यांनी आवक, स्टॉक रजिस्टर, का? तपासले नाही. दुकानांत भाव फलक, स्टॉक रजिस्टर याच्या नोंदी का? पहिल्या नाहीत. तक्रारदार यांना पंचनामा करताना का? जवळ येऊ दिले नाही. मग मोघम तपासणी करून काय साध्य होणार आहे.
कृपया वरिष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
ज्ञानेश्वर बीचीतकर
तक्रारदार

