अजिंक्य मधुकर राहाणे, येत्या ६ जून रोजी ३३ वर्षांचा होईल. ६ जून १९८८ रोजी त्याचा जन्म त्याची आई सविता यांचे माहेर असलेल्या संगमनेर तालक्यातील आश्वी खुर्द येथे झाला. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या अजिंक्यला इतरही खेळ आवडतात. कराटे हा त्यातील विशेष प्रकार. अजिंक्यने कराटेसारख्या खेळातही ब्लॅकबेल्ट मिळविला आहे. तोच अदभूत करिश्मा त्याने क्रिकेटच्या मैदानावरही गाजविला आहे. ३१ ऑगष्ट २०११ रोजी इंग्लंड विरूद्ध टि २० सामना खेळून स्वतःच्या आंतरराष्ट्रीय़ क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातच ३ सप्टेंबर रोजी आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. तर २२ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरूध्द टी पदार्पण केले. सलामीवीर म्हणून क्रिकेट कारकिर्द सुरू करणारा अजिंक्य नंतर संघात मधल्या फळीत स्थिरावला.
अजिंक्यने त्याच्या आठ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहीले. या आठ वर्षात तो भारताकडून ७३ कसोटी खेळला. त्यामध्ये १२ शतके व २३ अर्धशतकांंच्या मदतीने ४१.२८ च्या सरासरीने ४५८३ धावा ठोकल्या आहेत. कसोटीत १८८ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. नव्वद एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ३ शतके व २४ अधशतके त्याच्या नावावर असून ३५.२६ च्या सरासरीने नोंदविलेेल्या २९६२ धावा त्याच्यातील भक्कम फलंदाजाचे दर्शन घडवितात. वनडेत १११ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
तर २० टि -२० सामन्यात २ अर्धशतकांसह ३७५ धावा त्याने फटकविल्या आहेत. या प्रकारात ६१ धावांची त्याची सर्वोच्च खेळी होय.
पाच फूट सहा इंच उंची असलेला अजिंक्य एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू असून शांत व संयमी स्वभाव, परिस्थितीनुरूप स्वतःला समरस करून घेण्याची त्याची कला त्याला एक महान खेळाडू बनवून जाते. आपले उद्दीष्ट त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असल्याने तो अविवेकाने भटकत नाही. त्याचा खेळ सुध्दा असाच आहे. शांतपणे तो डावाची सुरुवात करतो. प्रतिपक्षाला कोणताही संशय न येता आपला डाव उभा करतो ही त्याची मोठी खासियत आहे. आक्रमक खेळण्यात भले तो रोहीत शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पांडया यांच्या सारखा धडाकेबाज नसेल परंतु संयमाने खेळून संघाला सुस्थिती मिळवून देणे हे त्याचे ध्येय असते हे त्याने अनेकदा सिद्धही करून दाखविले आहे.
त्याची धावांची, शतकांची संख्या कोहली, रोहीत यांच्या शतकएवढी फुगलेली नसली तरी संघाची धुरा वाहून घेण्यात तो त्यांच्या पेक्षा तसूभरही कमी नाही. परदेशात हिरव्यागार, वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टया असतात तेथे भारताचे आजवरचे रथी महारथी फलंदाज अपयशी ठरले आहेत. अशा खेळपट्टयांवर त्याने दृष्ट लागण्यासारखी फलंदाजी केली आहे. आपल्याला सांगण्यास मलाही आनंद होतोय की, परदेशात भारताच्या आजवर खेळलेल्या एका पेक्षा एक श्रेष्ठ फलंदाजांपेक्षा दुसऱ्या क्रमाकांची सरासरी अजिंक्यची आहे. दुसररी आनंदाची गोष्ट म्हणजे परदेशात सर्वोत्तम सरासरी आहे ती मुंबईच्याच लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांची !
अजिंक्यने परदेशात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या असून सन २०१४ ला लॉर्डसवर व सन २०२१ मध्ये मेलबोर्नवर खेळलेले शतकी विजयी डाव कोणीच विसरू शकणार नाही. एकदिवसीय सामन्यातही तो मधल्या फळीत चांगल्या पैकी खेळ करायचा परंतु कर्णधार कोहलीचे प्रयोग करण्याची पध्दत आजवर चौथ्या, पाचव्या क्रमांकावर कोणालाही स्थिर होऊ देत नाही. कोहलीच्या याच धरसोड पणामुळे अजिंक्य राहाणे सारखा तंत्रशुद्ध फलंदाज वनडेतून गायब झाला. अति विस्फोटक फलंदाजी सातत्याने करत नसल्याने टि २० मध्ये त्याला मोठी संधी उपलब्ध झाली नाही.
वनडे व टि- २० तून तडीपार झाल्यानंतर त्याने आपले लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रीत केले. कसोटीचा नियमीत खेळाडू असलेला अजिंक्य परदेशात चांगला खेळतो मात्र भारतात त्याचा खेळ काहीसा समाधानकारक होत नव्हता. शिवाय कर्णधार कोहली संघात सतत बदल करत असतो. त्याने एखादया कसोटीत खेळविलेला संघ पुढील सामन्यात तसाच खेळविल्याचे उदाहरण दुर्मिळ असेल ! याच प्रयोगात अजिंक्य राहाणे सारख्या फलंदाजाला देखील त्याने संघाचा उपकर्णधार असताना भारतातीलच नव्हे तर परदेशात त्याचा चांगला खेळ असतानाही वगळले आहे.
चांगला खेळ करत असूनही विनाकारण संघातून वगळल्या नंतर कोणत्याही खेळाडूच्या खेळ व मनसिकतेवर परिणाम होणारच ना ? तसा तो अजिंक्यच्या खेळावरही झाला. संघातील वरीष्ठ खेळाडू असूनही अजिंक्य अजूनही संघात अस्थिर असल्या साऱखं वाटतं. एखाद्या अनुभवी व भरवशाच्या खेळाडूवर कर्णधार अविश्वास दाखवत असेल तर ते संघाच्या हितासाठी नक्कीच घातक आहे.
अजिंक्यचं खास वैशिष्टये म्हणजे त्याने कसोटीत जेंव्हा जेंव्हा शतकी डाव खेळले त्या वेळी भारत कधीही पराभूत झाला नाही. इतकेच नाही तर कोहलीच्या गैरहजेरीत त्याने पाच कसोटयात भारताचे कर्णधारपद भूषविताना ४ विजय व १ अनिर्णित अशी अजिंक्य कामगिरी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात पहिल्या कसोटीत भारत ३६ धावांत सर्वबाद झाला, नामुष्कीजन्य पराभव झाला, कर्णधार कोहली मायदेशी परतला. त्यावेळी सर्वांनी भारत ४-० अशी मालिका हरेल असे ग्रहीत धरले असताना अजिंक्यने कर्णधारपद भूषविताना अतिशय बिकट परिस्थितीत फलंदाज म्हणून उत्कृष्ठ खेळ करून नेतृत्वगुण सिद्ध करताना कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत २-० असे लोळविले.
त्या दौऱ्यानंतर मायदेशी परतल्यानंतर त्याचे जंगी स्वागत झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारूचे चित्र असलेला केक काही उत्साही मंडळीनी आणला. तेंव्हा अजिंक्यने तो केक कापण्यास साफ नकार दिला. यावरून त्याचे विरोधकांविषयी असलेल्या आदराचे दर्शन झाले.
अजिंक्यने नेतृत्व केलेल्या कसोटयांत भारत कधीही पराभूत झाले नाही, तर कोहलीने नेतृत्व केलेल्या आयसीसी स्पर्धात भारत कधीही जिंकला नाही. त्यामुळे असे वाटते की, येत्या १८ जून पासून न्यूझिलंड विरूद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशीपच्या फायनलमध्ये अजिंक्य राहाणेकडे भारताचं नेतृत्व असावं व तो कप भारताच्या हाती यावा. परंतु बीसीसीआय व कोहली एवढा मनाचा मोठेपणा नक्कीच दाखविणार नाही. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच असेल तर ?
अजिंक्यने नेहमी त्याच्या कुवतीपेक्षा संघासाठी भरीव करण्याचाच प्रयत्न केला आहे. परंतु संघ व्यवस्थापन त्याला सतत संघात अस्थिर ठेवल्यासारखे वाटते. तेंव्हा कोहली आणि कंपनीने संघासाठी लकी असलेल्या अजिंक्यवर विश्वास दाखवून त्याच्यातील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये. कारण भारतासाठी किमान पाच वर्ष तो सेवा देऊ शकतो. भारताला कसोटीत अजिंक्य राहण्यासाठी अजिंक्य राहाणे कडे नियमीत कर्णधारपद दिल्यास त्याच्यातील फलंदाज आणखी निखार आणू शकतो. जर तरच्या काही गोष्टी बाजूला सारल्या तर अजिंक्य राहाणेच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते की, अजिंक्यने सतत अपेक्षित कामगिरी केली आहे, मात्र इतर ग्लॅमरस खेळाडूंच्या तुलनेत तो उपेक्षितच राहीला आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

