शिवराम पाटील यांच्या लेखनीतून..
प्रतिनिधी : संजय वायकर
जळगाव : (दि .१५ ) : कालच कांग्रेस व राष्ट्रवादी च्या पक्षसंघटनेबाबत लेख लिहीले.त्यात अमका,तमका असे मोघम न लिहीता जिल्ह्यातील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची नांवे लिहीली.अनेकांनी फोन केले.नेत्यांची नावे लिहू नका. त्यांचे मत आपल्याविषयी वाईट बनते.तेंव्हा म्हटले,त्यांच्या मताला किंमत उरलेली नाही. त्यांनीच आपली मते विकून टाकली.कोणी भाजपला तर कोणी शिवसेनेला.आणि मस्त आपली दुकानदारी सांभाळत आहेत.त्यांना पक्षहित व जनहिताशी काहीच देणेघेणे नाही. त्यांच्या दुकानदारी वर आंच येऊ नये म्हणून ते पक्षात जागा सांभाळून आहेत.
राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील जळगाव जिल्हात आले तेंव्हा शहराची एक आणि ग्रामीण एक अशी स्वतंत्र बेठक झाली. ग्रामीण बैठक लेवभवन मधे झाली तेथे तर निव्वळ पोरखेळ झाला.माझा फोटो बैनरवर का नाही? यावरून वादंग माजले.असेही माझा व्यवसाय अंधारात चालतो.मी पक्षाला देणगी देतो.तरीहि मला सन्मान मिळत नसेल तर काय उपयोग? मी प्रत्यक्ष जनतेत जाऊन काहीच काम करीत नाही.माझा चेहरा कोणी पाहिला नाही.किमान या निमित्ताने तरी माझा फोटो लोकांसमोर गेला असता.असा युक्तिवाद तार्किक खरा वाटला.पण पक्षाच्या दृष्टीने खोटा होता.
तेथील बैठकीत एकही ग्रामीण समस्या समोर आली नाही. फक्त मी मी करीत आयोजक व सगेसोयरे जागा बळकावून बसले.इकडे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात अभिषेक पाटील यांनी शहरातील लोकांना बोलवून हॉल पुर्ण भरला.जयंत पाटलांना लेवा भवन मधे जाणिवपूर्वक अडकवून ठेवले.दोन तास वाट पाहिल्यावर जयंत पाटील व सोबत ची खोगीरभरती आली.येताचक्षणी माईकवर सुचना.लवकर आटोपते घ्या.मला विमान पकडायचे आहे.असे होते तर लेवा भवन मधे वेळ का वाया घालवला?
या मधल्या काळात कुजबुज सुरू झाली कि,जुनी टिम अभिषेक पाटील विरोधात नियोजन करीत आहे.खूप मोठ्या कालांतराने नवीन चेहरा राष्ट्रवादी ला मिळाला.आणि तिकडे काडीच्याही कामाला न येणारी थेरडी माणसे कटकारस्थान करण्यात व्यस्त होती.
जयंत पाटलांच्या आगमनाचा ज्या प्रमाणात गाजावाजा केला,तसा दौरा यशस्वी झाला नाही.पदावर आहेत त्याव्यतिरिक्त एकही नवीन नागरिक राष्ट्रवादी कडे आकर्षित झाला नाही. हे सुद्धा राष्ट्रवादी चे दुर्भाग्य आहे.
राष्ट्रवादी व कांग्रेस या दोन्ही पक्षांना म्हातारपण आलेले आहे.म्हातारी आणि थकलेले बैल गोठ्यात वाढले कि शेतकरी दिवाळखोरीत जातो.हे जाणता राजाला सांगणे न लगे!अंगावरचे कपडे ,पादत्राणे महत्प्रयासाने सांभाळणारी माणसे आम जनतेत मिसळत नाहीत. संबोधन करीत नाहीत. समस्या ऐकून घेत नाहीत. फक्त नेत्यांची साथ आणि सरबराई करण्यालाच पक्षकार्य समजतात.येथे पाहिजे हिरो.नेपथ्यकार नको.
कांग्रेस ची दुरावस्था याहून खेदजनक आहे.मा.नाना पटोले प्रदेश अध्यक्ष यांची नियुक्ती झाल्यावर लोकांमधे उत्साह आला होता.पण आधिक काळ थकलेल्या,भागलेल्या,मरगळलेल्या पदाधिकाऱ्यांमधे गुरफटून राहिल्याने त्यांनाही म्हातारपण जाणवायला लागले.अद्याप कोणत्याही जिल्ह्यात फेरबदल केलेले नाहीत.जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस भवन ला कुलुप ठोकलेले आहे.बाजारातील लोकांचे स्वच्छतागृह म्हणून उपयोग होत आहे.
मा.नाना पटोले यांना भेटून अनेक जुने नवे कार्यकर्ते सक्रिय होऊ पाहातात.पण कांग्रेस भवनची कवाडे उघडी नाहीत. प्रत्येक तालुक्यातून आवाज येत आहे, नाना नाना ,कांग्रेस चे दार उघडा!
शिवराम भाऊ तुम्ही फटकळ लिहीता.आम्ही वाचतो.आवडते.पण प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकत नाही.आम्ही छापू शकत नाही. आम्हाला संबंध टिकवून ठेवायचे आहेत.तुम्हाला चार रुपयात पेपर देतो.तितकी तर कागदाची किंमत आहे. छपाई करणे शक्यच नाही.
शिवराम पाटील.
9270963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

