प्रमोद चौधरी / जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
तालुक्यातील तळई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे हे आडगाव ग्रामपंचायतीवर कार्यरत असतांना १४व्या वित्त आयोगाचा १८ लाख रूपये निधी परस्पर बँकेतून काढून घेतला व कोणतीही विकास कामे केली नाहीत, या आरोपाच्या तक्रारीवरून राजेंद्र सोनवणे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तर जानेवारी २०२१ पासून कर्तव्यावर हजर नसलेले चंद्रकांत सावकारे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एस.अकलाडे यांनी दिली आहे.
राजेंद्र सोनवणे हे आडगाव ग्रामपंचायतीवर कार्यरत असतांना मार्च २०२१ मध्ये त्यांनी १४व्या वित्त आयोगाचा १८ लक्ष रुपये निधी बँकेतून परस्पर काढून घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. माञ त्या निधीतून कोणतीही विकासकामे झाली नाहीत. त्याबाबत गटशिक्षणाधिकारी व्ही.एच.पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. पण ग्रामसेवक सोनवणे यांनी कागदपञे किंवा दप्तर पूरविले नाही. दरम्यानच्या काळात सोनवणे यांची आडगाव येथून तळई येथे बदली करण्यात आली. मात्र त्यांनी १४व्या वित्त आयोगाचा निधी कुठे खर्च केला ? याबाबत या ग्रामसेवकाने चौकशी अधिकार्यांना काही एक माहिती दिली नाही म्हणून शेवटी त्यांना निलंबित करण्यात आले.
तर खर्ची बु. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रकांत सावकारे हे डिसेंबर २०२० मध्ये रजेवर गेले. रजा संपल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये कर्तव्यावर हजर झाले नाहीत म्हणून त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याचा व निलंबनाच्या कारवाईचा कालावधी ठरविण्याचा अधिकार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे. तालुक्यात ५२ ग्रामपंचायती असून ग्रामसेवकांची संख्या ३१ आहे.
शासनातर्फे ग्रामविकासासाठी अनेक योजना असून त्या योजनांच्या अंमलबजावणी साठी शासनातर्फे भरघोस निधी ग्रामपंचायतींना दिला जातो परंतू प्रत्यक्षात जर निधीसंबंधी गैरव्यवहार/अपहार झाला तर विकासाऐवजी गावाचे भकास चिञ कायम राहते. गावाचा चेहरामोहरा बदलेल, गावात शहराप्रमाणे सर्व प्राथमिक गरजा पुरविण्यात येतील असे स्वप्न साकार होऊ शकत नाही. परीणामी ‘ग्रामविकासाची ऐशीतेशी माझ्या खाबूगीरीची झाली सरशी’ असे विदारक चिञ पहायला मिळते.


