प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई - जमीन मोजणी प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकांकडून बंदोबस्त देण्यास टाळाटाळ करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा वडाळा बहिरोबा येथील मनीषा पतंगे यांनी दिला आहे.
निवेदनात श्रीमती पतंगे यांनी म्हटले की, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सामायिक क्षेत्र असलेल्या गट नंबर १७६ ची शासकीय मोजणी रितसर चलन भरून करून घेतली आहे. परंतु कुठलाही न्यायालयीन वाद चालू नसताना त्यांच्या गटाच्या लगतच्या काही शेतकऱ्यांनी हद्द कायम करण्यासाठी विनाकारण हरकत अडथळा निर्माण केला आहे.
सदर जमीन आमचा मतिमंद (दिव्यांग) मुलगा प्रणव सुनील पतंगे याच्या नावावर असून त्यांचे पतीही डिप्रेशन मध्ये असल्याने त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुराबा करून हद्द कायम करण्यासाठी सशुल्क तत्वावर बंदोबस्त मंजूर करून घेतला. १९ जून रोजी भूमिअभिलेखची नोटीस देण्यासाठी ते पोलीस ठाण्यात. गेले असता सहायक पोलीस निरीक्षकांनी हद्द कायम करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नसल्याचे सांगून या नोटिशीचा आम्हाला उपयोग नसल्याचे सुनावले.
यावरून त्यांची याप्रकरणी बंदोबस्त देण्याची मानसिकता नसल्याचे व आम्हाला त्रास देण्याचा हेतू असल्याचा आरोप करून आम्ही दि.७ जुलै २0२१ रोजी गट नंबर १७६ या क्षेत्रातच सहकुटुंब आत्मदहन करणार असल्यांचा इशारा दिला आहे.
जो पर्यंत मोजणी करून हद्द कंपाउंड होत नाही तो पर्यंत आत्मदहन करण्याचा निश्चय पक्का असून शेजारील कोणी अडथळा आणला तर सरकारी कामातील गुन्हे दाखल करावेत, अश्या मोजण्या करण्यात अर्थ नाही.---मनीषा पतंगे,वडाळा बहिरोबा,
वडाळा बहिरोबा येथील शेतकरी मनीषा पंतगे यांची गट नंबर १७६ मध्ये जमीन असून त्यानी जमिनीची मोजणी करण्यासाठी पोलीस संरक्षणांची मागणी केलेली आहे. चौकशी करून बंदोबस्त दिला जाईल. आज स्वतः जाऊन पाहणी केली असून शेजारील शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. - सचिन बागुल, पोलीस निरीक्षक शनी शिंगणापूर.

