प्रतिनिधी : संजय वायकर
➖➖➖➖➖➖
शहादा : (दि . 28) : संभू सदाशिव पाटील रा.मा.मोहीदे ता . शहादा यांचे 26 जून शनिवार रोजी रात्री 10:00 वा निधन झाले . कै.संभु दादाच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह देहदानासाठी धुळे मेडिकल कॉलेज येथे देण्यात आला.
शंभू दादा,आदर्श योगी!
शंभू दादा निवर्तले.योगीने इहलोक यात्रा संपवली.
एक आदर्श शेतकरी व समाजसेवक आपल्यातून ईश्वराकडे गेले .
दादांची ओळख आण्णा हजारे यांच्या मिशनमधून झाली. भ्रष्टाचार विरोध फक्त पदापुरता,भाषणापुरता न करता दादांनी ते पथ्य पाळले.जे करायचे ते स्वत:च्या खर्चातून करायचे.मी राळेगणसिद्धी ला जातो.आण्णांना भेटतो.त्यासाठी वाहनभाडे,प्रवासखर्च वसुली करणारे नंदुरबार जिल्ह्यात अनेक पाहिले. पण दादांनी कधीच कोणाची चहाची अपेक्षा ठेवली नाही. हे विशेष उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे.म्हणूनच दादांना मी आदर्श मानले.अनुकरण केले.
दादा मुळचे मोहिदा गावचे शेतकरी, सरपंच असूनही त्यांनी त्यांचे अधिकतम वास्तव्य समशेरपूर येथील शेतात घालवले.त्यानिमित्ताने आमची टिम दिवसरात्र दादांसोबत असे.मी दादांचा शिष्य, स्नेही,अनुयायी आहे,हे सांगतांना मला आभिमान वाटायचा.मी त्यांचेपासून बरेच काही शिकलो पण दादांची शाब्दिक सभ्यता शिकलो नाही. तहसीलदार, कलेक्टर, बीडीओ ,सीईओ किंवा कोणी आधिकाऱ्यांशी मी कडव्या शब्दात बोललेले दादांना आवडत नसे.म्हणून म्हणत,"तुम्ही सासूच्या पाया पडायला जाता आणि तिचे तोडे मोजून घेता."मी दादांचा अभिप्राय आजही मान्य करतो.पण माझ्या शब्दात बदल होत नाही.कदाचित होणार नाही. जित्याची खोड मरेपर्यंत जात नाही. असे म्हणून दादांपुढे नमत होतो.
दादा जन्माने हिंदू,गुजर असूनही बौद्ध तत्वांचे पालन करीत.बौध्द धर्मियांचे विवाह पंडित म्हणून काम करीत.म्हणजे अलोपॅथी डॉक्टर सैम्युयल हैनिमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावण्यासारखेच होते.दादा महात्मा गौतम बुद्ध यांचे खूप जवळ पोहचलेले मी पाहिले आहे.निळा झेंडा मिरवणारे तितके पोहचलेले नाहीत.
दादांचा परिचय नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांना होता.पण दादांनी एक कवडीचा आर्थिक लाभ घेतला नाही. समाजसेवा,राजकारण, धर्मकारण आर्थिक लाभासाठी कधीच केले नाही. म्हणून मग दादांना योगी म्हणतो. बायको, मुले,नातवे,शेती,घर सर्वच ऐहिक सुखात रमलेले दादा आयुष्याचा उत्तरार्ध निर्लोभ जगले.हे महात्मा गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आहे अशा क्वचित महाभुतींना जमले.दादा मात्र त्या दिशेने बरेच पुढे निघून गेले होते.
दादांचे अनुयायी नंदुरबार चे डॉ. वसंतराव चौधरी असेच निरभिक्षीत गृहस्थ. त्यांच्या माध्यमातून आम्हाला दादांचे अनुयायित्व मिळाले.आम्ही पालन केले.माझ्या काळातील सभ्य,सज्जन,योगी विभुतींना मी ओळखले,अनुभवले.हे माझे भाग्य समजतो.एरवी ,मी रामायणकाळात असतो तर रामाला मदत केली असती असे म्हणणारे प्रत्यक्षात रावणाचा रथ हाकलत आहेत.मला योगीसारखे जगता आले पाहिजे, अनिभिक्षीत जगता आले पाहिजे, असा प्रयत्न क्वचित लोक करीत असतात,क्वचित जगत असतात.त्यापैकी शंभू दादा हे होते.
जीवनाला सुरुवात झाली तर शेवट असणारच.हे निसर्गतत्व मान्य करून आम्ही दु:ख मानत नाहीत. आक्रोश करीत नाहीत. पण त्यांचे सत चित आनंद तत्व कदापि विसरणार नाही. दादा गेले,मी जाणार तरीही हे तत्व पालन करणाऱ्या मानसांची शृंखला खंडित होणार नाही. त्या शृंखलेत आम्ही दादांना स्मरण करू.
....शिवराम पाटील.
9270963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

