नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के): नगर तालुक्यातील दरेवाडी या गावात एकूण बारा हजारच्या वर लोकसंख्या आहे. नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर दरेवाडी गाव असल्याने येथील लोकसंख्या मागील काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. लोकसंख्या जास्त असल्याने कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्याही जास्त होती, अशा परिस्थितीत दरेवाडी ग्रामपंचायत मार्फत अनेक उपाययोजना व कठोर निर्णय घेऊन दरेवाडी गावाला कोरोना मुक्त गाव करण्याचे उद्दीष्ट ठेवले गेले.
कोरोना काळात गाव बंदीचा निर्णय योग्य वेळेत घेण्यात आला तसेच गावातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे, शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत यशस्वीपणे राबविली गेली. गावातील कोरोना दक्षता समिती मार्फत दैनंदिन अहवाला नुसार बारकाईने लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काझी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कांगुणे यांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना राबविल्या गेल्या.
लसीकरण केंद्रावरील नियोजन व माहिती नागरिकांपर्यंत कळविणे, गावामध्ये कोरोना तपासणी घेणे, आर.टी.पी.सी.आर तपासणी शिबीर राबविणे, रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठविणे अशा विविध उपाययोजना राबवून दरेवाडी हे गाव आज कोरोनामुक्ती कडे वाटचाल करत आहे अशी माहिती दरेवाडी ग्रामपंचायत मार्फत देण्यात आली आहे. रुग्ण संख्या मोठ्या गतीने वाढण्याची शक्यता होती मात्र सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्याने ही रुग्ण संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. या संपूर्ण मोहिमेत तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, संपर्क अधिकारी सांगळे, वैद्यकीय अधिकारी अविनाश कांगुणे, कोरोना ग्रामसुरक्षा समिती, दरेवाडी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी संपतराव दातीर, सरपंच स्वाती बेरड, उपसरपंच अनिल करांडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी बोत्रे, नंदा वाघ, शेंदूरकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रा.पं. कर्मचारी व गावातील नागरिकांचे योगदान मिळाले.

