छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथे झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादीवरती दत्तक म्हणून आले.1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली त्यांना राज्याभिषेक झाला.
राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले, छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये प्रचंड वात्सल्य होते.ते जसे स्वाभिमानी होते,तसेच ते प्रेमळ होते.
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली.बोर्डिंग सिटी अशी कोल्हापूरची ओळख होती.
राजर्षी शाहू महाराजानी 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. 1919 साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. त्यांनी भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर 1908 साली बांधले. छत्रपती शिवाजी राजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.
1899 साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली. बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली. डोणे नावाचे धनगर विद्वान त्या शाळेचे प्राचार्य होते. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित नावाचे पुस्तक लिहिले. बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही, हे त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना करून सिद्ध केले. स्वतंत्र धर्मपीठावर त्यांनी सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या विद्वानाची नियुक्ती केली.त्यांनी ब्रह्मचारी न राहता लग्न करावे व माणसांनी खाद्यावर घेतलेल्या पालखीत बसू नये,असा जाहीरनामा शाहू महाराजांनी काढला.
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी 1902 साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय! प्रशासनातील एकाधिकारशाहीला त्यांनी पायबंद घातला.त्यांनी सर्व जातींना प्रसासनात प्रतिनिधित्व दिले.
शाहू महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते,त्यांनी भविष्य,पंचांग,मुहूर्त कधीही पाहिले नाही.भविष्य सांगण्यासाठी आलेल्या जोतिष्याला तुरुंगात डांबून त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे महत्व पटवून दिले.त्यांनी भाकडकथा, पुराणकथा नाकारून प्रतिगामी विचारांना नेस्तनाबूत केले.त्यांनी ग्रंथप्रामान्य नाकारले.
शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. मूकनायक या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले "बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत". शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले "रमाबाई माझी धाकटी बहीण आहे, तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो"
माणगाव आणि नागपूर येथील परिषदेत जाऊन शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खंबीर पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्प वरती स्नेहभोजन दिले आणि मानाचा जरीपटका देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "छत्रपतींनी मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला, त्याचा मी सदैव सन्मान राखीन"
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू-मुस्लिम हा भेद केला नाही. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी त्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. आपल्या राज्यातील गरिबातल्या गरीब मुस्लिमांना कुराण मराठी भाषेत वाचता यावे, यासाठी अरबी भाषेतील कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली. शंभर वर्षांपूर्वीची ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. शाहू महाराजांनी पाटगावच्या मौनी बाबाच्या मठाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील मुस्लिमांच्या मशिदीच्या बांधकामासाठी दिली, तर रुकडीतील पिराच्या देवस्थानाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील अंबाबाई मंदिराच्या बांधकामासाठी व दिवाबत्तीसाठी दिली, इतका सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता.
शाहू महाराजानी आपल्या राज्यात सर्वांचा विकास आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे संघर्ष केला, परंतु आज सामाजिक वातावरण बिघडवले आहे, जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पेरले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सर्व समाज बांधवांनी एकोपा जपावा, हे शाहूचरित्र सांगते,
शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा आपण कायम ठेवणे, हेच खरे शाहू प्रेम आहे.शाहू राजांची जयंती(२६ जून) सणासारखी साजरी करा, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले आहे,त्यांच्या विचारांचे आपण आचरण करूया.आज शाहू महाराजांची जयंती(26 जून) आहे,जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.


