साकीब अल हसन हा बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार. २४ मार्च १९८७ रोजी मगुर येथे त्याचा जन्म झाला. डाव्या हाताने विश्वसनीय फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूची डावखुरी फिरकी गोलंदाजीही प्रभावी असल्याने ६ ऑगष्ट २००६ रोजी झिंबाब्वे विरूध्द एकदिवसीय सामना खेळून त्याने स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर २८ नोव्हेंबर २००६ रोजी झिंबाब्वेविरुद्ध खेळूनच टि २० मध्ये पदार्पण केले. त्यानंतर १८ मे २००७ रोजी भारताविरूध्द खेळून कसोटी कारकिर्दीचा शुभारंभ केला. बॅट व बॉलने करामत करत त्याने प्रथम बांगलादेश संघात आपले आसन पक्के केले. त्यानंतर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःला स्थापित केले. दिवसेंदिवस त्याच्या खेळाचा आलेख उंचावत जात असताना आशिया खंडातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्या नावाचा गवगवा झाला. ही बातमी क्रिकेटचे बायबल समजले जाणाऱ्या विस्डेन या जगप्रसिद्ध क्रिकेट नियतकालिका पर्यंत पोहचली. साकीबच्या अष्टपैलू खेळाची पूर्ण शहानिशा करून सन २०२० मध्ये त्याच्या नावाची जगातील आजपर्यंतचा क्रमांक दोनचा अष्टपैलू खेळाडू म्हणून "विस्डेन" या अंकात नोद केली.
वनडे, टि-२० व कसोटी या क्रिकेटच्या तिनही प्रकारात सन २०१५ या कॅलेंडर वर्षात सर्वोत्तम कामगिरी करताना आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या रँकींग मध्ये प्रथम मानांकन मिळविले. आयसीसीच्या मानांकनात एकाच वेळी तीनही प्रारूपात अव्वल क्रमांक मिळविणारा तो जगातील पहिला व आता पर्यंतचा एकमेव खेळाडू आहे.
सााकीब आतापर्यंत ५६ कसोटी खेळला असून ३९.४० च्या सरासरीने ३८६२ धावा त्याने ५ शतके व २४ अर्धशतकांच्या मदतीने बनविल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत २१० बळीही मिळविले. डावात ५ बळी मिळविण्याची कामगिरी त्याने १८ वेळा केली आहे. क्षेत्ररक्षणात २४ झेलही त्याच्या हाती लागले आहेत.
२०६ एकदिवसीय सामन्यात ३७.८६ च्या सरासरीने ९ शतके व ४७ अर्धशतकांच्या साह्याने ६३२३ धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आहेत. शिवाय गोलंदाजीत २६० फलंदाजांना बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. डावात ५ बळींचा पंचक त्याने दोनदा साधला असून ५० झेलही त्याने पकडले आहेत.
बांगलादेशसाठी ७६ टि२० सामने खेळताना २३.७४ च्या सरासरीने ९ अर्धशतकांच्या मदतीने १७६७ धावा त्याने ठोकल्या आहेत. गोलंदाजीत ९२ बळी घेताना ५ बळी घेण्याची करामत त्याने एकदा केली आहे. तर १९ झेल त्याच्या नावे नोंदले आहेत. क्रिकेटच्या तिनही प्रकारात डावात पाच बळी घेणारा तो एक दुर्मिळ खेळाडू आहे.
सन २००९ मध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजचा दौरा केला. त्या दौऱ्यात पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी 'नियमित कर्णधार मुशर्रफे मुर्तजा जखमी झाल्याने त्याच्या ऐवजी उपकर्णधार असलेल्या साकीबने प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषविले. त्याने बांग्लादेशचे १३ कसोटी, ५० वनडे व १७ टि-२० सामन्यात नेतृत्वही केले आहे.
साकीबच्या वरील कामगिरीकडे बघितल्यास तो एक क्रिकेटपटू म्हणून निव्वळ बांगलादेशसाठीच नव्हे तर समस्त क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु जगाच्या बोटावर काही असे मोजकेच खेळाडू आहेत की त्यांच्या डोक्यात यशाची हवा गेली नाही. साकीबचं जागतिक क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे हे कदाचित तो विसरला असावा . कारण त्याच्याकडून नंतर काही असे गंभीर प्रमाद झाले की निव्वळ त्यालाच नव्हे तर बांगलादेश क्रिकेटला शरमेने मान खाली घालावी लागली.
सन २०१८ मध्ये तब्बल तीन वेळा सट्टेबाजांच्या संपर्कात गेल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले. आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटच्या नियम क्रमांक २ : ४ : २ चे भंग केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर दोन वर्ष निलंबनाची कारवाईदेखील आयसीसीने केली. पुढे जात आयसीसीने त्याला एक वर्ष सजा माफ केली. त्यानंतर त्याच्या छोट्या मोठया चुका होतच होत्या.
परंतु त्यानंतर त्याने कहरच केला. सध्या बांगलादेशमध्ये ढाका प्रिमियर लिग स्पर्धा सुरू आहे. त्यामध्ये अकरा जून रोजी मोहम्मेडन स्पोर्टींग क्लब व अबाहनीलिमिटेड या दोन संघात सामना खेळला जात होता. सर्वप्रथम सामन्याच्या पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरवर गोलंदाज साकीबने मुस्तफिकूर रहेमान विरूध्द पायचितचे अपिल केले. त्यावर पंचानी फलंदाजाला नाबाद ठरविल्यामुळे साकीबचा राग अनावर झाला आणि त्याने पंचाच्या समोर जात स्टंपवर लाथ मारली व पंचाशी वाद घालू लागला. हा किस्सा घडतो न घडतो तोच लगेच नंतरच्या षटकात पाऊस आल्याने पंचानी खेळ थांबविण्याचा इशारा केला. त्यावेळी पुन्हा साकीब भडकला व त्याने पंचाजवळ जात तिन्ही स्टंप जमिनीतून काढून फेकून दिले. त्यानंतर एक स्टंप पुन्हा जमिनीत रोवला. ढाका प्रिमियर लीगचे सामने यूट्यूब आणि फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम होत असल्याने ही सर्व घटना प्रेक्षकांनी घर बसल्या बघितली. या घटनेनंतर साकीब विषयीच्या भावना भडकल्या. घटनेचं गांभिर्य लक्षात घेत नंतर त्याने फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकून माफी मागितली.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. खेळाडू देवासमान गणले जातात. मग त्यांना आपल्या विषयी समाजात काय भावना आहे याची कल्पना नसावी का ? क्रिकेटमुळे मिळणारी वारेमाप प्रसिध्दी व अमाप पैसा या खेळाडूंची मती मारत आहे. साकीबचे गुन्हे हे गंभीर असून क्रिकेटला काळीमा फासणारे आहे. तो मानसिक, शारीरीक व वयानेही परिपक्व असल्याने त्याला माफ करणे म्हणजे भविष्यात याच्यापेक्षा गंभीर गुन्ह्यांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. तेंव्हा बीसीबी व आयसीसीने तो किती मोठा खेळाडू आहे हे न बघता त्याने केलेले कृत्य अतिशय हीन वृत्तीचे असल्याने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबीत करावे व त्याला क्रिकेटमधून मिळणारे सर्व आर्थिक लाभ बंद करावेत. म्हणजे असे गुन्हे करताना खेळाडूंनी हजार वेळा विचार केला पाहीजे. तरच क्रिकेट आपली सभ्य गृहस्थांचा खेळ ही प्रतिमा जपेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

