shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र सरकारची देशातील साखर उद्योगाला पूरक धोरणे - हर्षवर्धन पाटील - इथेनॉलचे धोरण क्रांतिकारक

केंद्र सरकारची देशातील साखर उद्योगाला पूरक    धोरणे - हर्षवर्धन पाटील

 - इथेनॉलचे धोरण क्रांतिकारक
इंदापूर :प्रतिनिधी दि.13/6/21
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्र सरकारने गेल्या दोन वर्षात साखर उद्योगासाठी राबवलेल्या दीर्घकालीन स्वरूपाच्या पूरक धोरणांमुळे सध्या अडचणीतील साखर उद्योगाला आधार प्राप्त झाला आहे. साखर उद्योगासाठी इथेनाॅलचा पेट्रोलमधील 20 टक्के मिश्रणाच्या निर्णय क्रांतीकारक आहे. या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे देशातील साखर उद्योग मजबूत होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे तसेच अतिरिक्त साखर उत्पादनाची समस्या कायमची दूर होईल, अशी माहिती भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावरती शनिवारी (दि.12) दिली.
         हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. चालू हंगामात 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. यापूर्वी केंद्राने साखरेची  एम.एस.पी. प्रति क्विंटलला रू. 3100 केली. आता त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. तसेच केंद्र सरकारने उसाची एफआरपी गेल्यावर्षी प्रति टन शंभर रुपयांनी वाढविली आहे. त्याचप्रमाणे इथेनॉलच्या दरात चांगली वाढ केली आहे. शिवाय बायो सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पांसाठी रू. एक लाख कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या साखर उद्योग पूरक धोरणांमुळे अडचणीतील साखर उद्योगाला दिलासा मिळत आहे, तसेच आगामी काळात केंद्र सरकार हे  साखर उद्योगाला दिलासा देणारे आणखी निर्णय घेईल, असा आशावादही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 
          ते पुढे म्हणाले, सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येत आहे. तेल कंपन्यानी चालू वर्षी 500 कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले असून आजपर्यंत साखर कारखान्यांनी सुमारे 370 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. आगामी पाच वर्षासाठी तेल कंपन्यानी 2500 कोटी लिटरचे  टेंडर काढले आहे. तसेच एक टक्का डिपॉझिट हे इथेनॉल पेमेंट मधून घेण्याचा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
        केंद्र सरकारने इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचा आदेश दिलेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह केंद्रीय मंत्रिगटाच्या अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियम मंत्री पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले. दि. 1 एप्रिल 2023 रोजी पासून 20 टक्के  केले जाईल. त्यामुळे दर वर्षी 1000 कोटी लिटर इथेनॉलची तेल कंपन्यांकडून मागणी होईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
               इथेनॉलला चांगले दर मिळत आहेत. याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होऊन दुसऱ्या बाजूला पेट्रोलचे वाढते दर आटोक्यात येण्यासही मदत होणार आहे, शिवाय देशाच्या परकीय चलनात बचत होत आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. 
         राज्यात इथेनॉलचे सुमारे 100 पेक्षा अधिक प्रकल्प आहेत.आगामी काळात या   प्रकल्पांचे विस्तारीकरण करण्यासाठी  केंद्र सरकारने व्याज सवलत योजना जाहीर केली असून 6 टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. आता राज्य सरकारने इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारीकरण कर्जावरील उर्वरित 6 टक्के व्याज भरावे, तसेच साखर कारखान्यांकडून उत्पादित इथेनॉल वरतीवरती 85 टक्के कर्ज  द्यावे, त्यासाठी राज्य सहकारी बँकेने परिपत्रक काढावे, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
          देशात नुकत्याच संपलेल्या सन 2020-21 च्या गाळप हंगामात देशात 322 लाख मे. टन साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने 60 लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिल्याने साखर उद्योगास दिलासा मिळाला आहे. सध्या देशामध्ये ऊस हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने शाश्वत पीक असल्याने पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे आगामी काळात ऊस क्षेत्र वाढले तरीही अतिरिक्त साखरेचा प्रश्न हा इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती वाढणार असल्याने शिल्लक राहणार नाही, असा आशावादही  हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालसाहेब पवार, सुरेश मेहेर उपस्थित होते. 

close