shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना '' दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ व हवामानाची संमिश्र कामगिरी..!!

इंग्लंडमधील साऊथॉम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडीयमवर पहिल्या कसोटी क्रिकेट विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसाच्या नावे अर्पण झाल्यानतर दुसऱ्या दिवशी मोठया आश्वासक वातावरणात खेळाला सुरूवात झाली. दिवसभरात ९८ षटकांचा खेळ होणे अपेक्षित होते. मात्र सुर्यदेवतेने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही या सामन्यावर बहिष्कार घातल्याचे स्पष्टपणे दिसत होते. किमान चार वेळा सामना अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे थांबवावा लागला, अखेर शेवटच्या सत्रात याच कारणामुळे खेळ थांबला असता वरूण राजाने मैदानाचा ताबा घेतला व खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. दुसऱ्या दिवसात नियोजित कार्यक्रमानुसार ३३.२ षटकांचा खेळ होऊ शकला नाही.
                       

इंग्लिश प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सामना सुरु झाला. तत्पूर्वी नाणेफेक झाली ती नेहमी प्रमाणे भारताचा कर्णधार विराट कोहलीने गमावली. ढगाळ हवामान व त्या वातावरणाचा लाभ घेणारे हुकमी जलदगती गोलंदाज संघात असल्याने न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनने क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
                         
भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा व शुभमन गिल इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी सामन्यात सलामीला उतरल्याने व हवामान न्यूझिलंडच्या जलदगती गोलंदाजांना पोषक असल्याने त्यांच्या कामगिरी विषयी शंका घेतली जात होती. परंतु त्या दोघांनीही अतिशय सुरेख सुरूवात करून दिली. बीसीसीआयचे अध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी म्हंटले होते सलामीवीर कमी कमीत पहिले २० षटके टिकले पाहिजे. हे ध्यानात ठेवून भारताची सलामी जोडी बरोबर २० षटके खेळली व २१ व्या षटकाच्या जेमिसनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रोहीत एक बेजबाबदार फटका मारून बाद झाला. त्याने ३४ धावा केल्या. गिल व रोहीतने ६१ धावांची सलामी दिली. त्यानंतर ६३ या धावसंख्येवर गिलच्या रुपात भारताला दुसरा झटका बसला त्याने २८ धावा केल्या. रोहीत व गिलचे जम बसल्यानंतर निष्काळजीपणे खेळणे भारताला महागात पडले. ते दोघे खेळत होते तेव्हा न्यूझिलंडचा संघ काहीसा दबावात वाटत होता. परंतु या दोघांच्या पतनानंतर किवीज संघात एक वेगळाच जोश आला.
                          
पुजाराला ३४ चेंडू खाते उघडण्यासाठी वाट पहावी लागली यावरून किवीज गोलंदाजांची अचूकता व भेदकपणा लक्षात येतो. ५४ चेंडूत केवळ ८ धावा काढून बोल्टच्या गोलंदाजीवर पायचित झाला. पुजाराने चेंडू जास्त खेळून गोलंदाजांना थकवले असले तरी धावा काढण्याच्या अनेक संधी गमावल्या. त्यामुळे गोलंदाजांचा जोर वाढतो व भारतीय संघावर दबाव वाढतो. या गोष्टीकडे पुजाराने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचे मैदानात जास्त काळ उभे राहाणे गोलंदाजांवर दबाव वाढविणारे असले तरी धावा न वाढविणे भारतीय संघासाठी संकट ओढविण्यासारखे आहे.
                          
त्यानंतर कर्णधार कोहली व उपकर्णधार अजिंक्य राहणेने जबाबदारीने खेळत बळींच्या रूपात संघाला नुकसान होऊ दिले नसले तरी धावांची गती वाढविण्यात त्यांनाही म्हणावे इतके यश न आल्याने भारताला अपेक्षित धावसंख्या उभी करता आली नाही. अपुरा सुर्यप्रकाश व पावसाने खेळ थांबला तेंव्हा कोहली ४४ व राहाणे २९ धावांवर खेळत आहेत.
                            
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी क्रिकेटसाठी पोषक वातावरण असण्याची शक्यता असल्याने आज जास्त खेळ होणे अपेक्षित आहे. कोहली व राहाणे यांच्याकडून आज मोठया खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर पंत, जडेजा, आश्विन यांनीही आपल्या बॅटने करामत केली तर भारत एक सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकेल. मग त्याच जोरावर भारतीय गोलंदाज किवीज संघाला जेरबंद करू शकेल.
                            
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा सारासार विचार केला तर भारत, न्यूझिलंड या दोन्ही संघाबरोबर अपुरा सुर्यप्रकाश व पाऊस यांनी संमिश्र पणे आपली भूमिका वठवली.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close