shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रक्तदान करा व जगाचे स्पंदन कायम ठेवा..!!

"रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान" आहे.  हे सर्वात श्रेष्ठ जीवनदान आहे. आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती ही रक्तदान करुन दुसऱ्याचा जीव वाचवू शकते.

राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-

"रक्तदाता" हा रुग्णांचा महत्त्वाचा दुवा असल्याने स्वैच्छिक रक्तदात्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. 


"रक्‍त" हे शरीराचा अविभाज्‍य घटक असून संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषण व प्राणवायू (ऑक्‍सीजन) देण्‍याचे काम रक्‍त करत असते. गरजू रुग्‍णांसाठी रक्‍तदान केल्‍याने त्‍यांचे प्राण आपण वाचवू शकतो, असा संदेश "स्वैच्छिक रक्तदाता" म्हणून समाजासाठी देऊ शकतो.

याही वर्षी १४जून "जागतिक रक्तदाता दिन" आणि सप्ताह निमित्ताने" रक्तदाते रक्तपेढीत स्वैच्छिक रक्तदान करून तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करून  "स्वैच्छिक रक्तदान " करतात.

  या वर्षाचे शासनाचे घोष वाक्य आहे 

"रक्तदान करा व जगाचे स्पंदन कायम ठेवा..!

माझे "स्वैच्छिक रक्तदान" का महत्त्वाचे :-


◆थँलेसेमिया,हिमोफिलिया,प्रसूती,अपघात,रक्तक्षय, इ.रुग्णांसाठी रक्त हे "लाईफ लाईन" आहे, अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज असते. अशा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी माझे रक्तदान अमूल्य आहे.

◆बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

◆रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळे कोणत्याही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.

◆मानवी रक्ताला पर्याय नाही कारण "रक्त" हे कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत तसेच कारखान्यात तयार करता येत नाही तसेच जास्त दिवस साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे माणसाचा जीव वाचविण्यासाठी माणसाचेच रक्त द्यावे लागते. यासाठी "माझे स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे".

◆रक्तदान हे जीवनदान आहे म्हणून "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान" आहे. यासाठी माझे रक्तदान महत्त्वाचे.

◆दान केलेले रक्त चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या भरून निघते.

◆माझ्या स्वैच्छिक रक्तदानाने एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.यासाठी माझे स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.

◆माझे रक्तदान सुरक्षित,आनंददायी तसेच वेदनारहित असते. यासाठी महत्त्वाचे.

◆समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून नि:स्वार्थपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवेच्या भावनेतून आपले रक्तदान महत्त्वाचे.

महाडचे श्री.शरद मुरलीधर गांगल (रक्तदाता) यांचे 131 वेळा रक्तदान:-

रायगड जिल्ह्यातील महाड येथील श्री. शरद मुरलीधर गांगल (वय 59 वर्ष ) यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या रक्तपेढीत जाऊन "131" वेळा रक्तदान करून नवा आदर्श घडविला आहे. 125 वे रक्तदान जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड रक्तपेढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड तर 131 वे रक्तदान जनकल्याण रक्तपेढी महाड -रायगड येथे केले. श्री.शरद गांगल हे "रक्तदाता" म्हणून रायगड जिल्हासाठी अभिमानाची बाब आहे. रक्तदानाबद्दलच्या सर्व नोंदी त्यांच्याजवळ असून महाराष्ट्रात असे रक्तदाते नगण्यच आहेत. म्हणून आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त श्री. शरद मुरलीधर गांगल नवीन रक्तदात्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

स्वैच्छिक रक्तदानाविषयी :-
 "रक्तदाता" हा रुग्णांचा महत्त्वाचा दुवा असल्याने स्वैच्छिक रक्तदात्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. 

"रक्‍त" हे शरीराचा अविभाज्‍य घटक असून संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषण व प्राणवायू (ऑक्‍सीजन) देण्‍याचे काम रक्‍त करत असते. गरजू रुग्‍णांसाठी रक्‍तदान केल्‍याने त्‍यांचे प्राण आपण वाचवू शकतो, असा संदेश "स्वैच्छिक रक्तदाता" म्हणून समाजासाठी देऊ शकतो.

रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यास उत्तेजना मिळते. रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते. त्यामुळे कोणत्याही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.

आपल्या शरीरात अंदाजे ५ ते ६ लिटर रक्त असते त्यातील फक्त 350 मिलीलिटर म्हणजे पाच टक्केच रक्त रक्तदानाव्दारे घेतले जाते.

रक्तदानापूर्वी रक्तदात्याचे वजन, वय, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तदाब आदी तपासणी वैद्यकीय तज्ञांच्या व्दारे करुनच रक्तदानासाठी परवानगी दिली जाते.

रक्तदानासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात मात्र आपल्या स्वैच्छिक रक्तदानाने एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.

दान केलेल्या रक्ताची एचआयव्ही, कावीळ (बी आणि सी), गुप्तरोग, मलेरिया, इ.तपासणी करून रुग्णांना दिले जाते.

रक्तदानाने लालपेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका इ. काँम्पोनंट सप्रेशनव्दारे वेगवेगळ्या करून गरजू रुग्णांना वेळप्रसंगी दिल्या जातात, याचा अनेक गरजू रुग्णांना फायदा होतो.

  
करोना काळात रक्तदात्यांमध्ये भीतीचे वातावरण आणि लॉकडाऊन:-

सध्या देशात कोविड-19 विषाणूची साथ आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कंपन्या, महाविद्यालय तसेच विविध संस्था, कार्यालये बंद असून रक्तदानाविषयी रक्तदात्यांमध्ये भीती अथवा संभ्रम निर्माण झाला. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला. गरजू रुग्णांना यामध्ये थँलसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, प्रसूती, अपघात आदी रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासू लागली. यासाठी रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना यामध्ये सोशल डिस्टंसिंग,मास्क वापरणे, सँनिटायझरचा वापर इ.सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीर आयोजित केल्यास अथवा रक्तसंक्रमणामुळे करोना विषाणूची लागण होत नाही असे तज्ञांच्या मतानुसार शासन स्तरावरून सांगण्यात येत आहे. शासनाकडून मा. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद ,राष्ट्रीय एड्स नियंत्रण तसेच जिल्हाधिकारी, राज्य रक्त संक्रमण परिषद, रक्तपेढी प्रमुख, समाजातील इतर मान्यवर यांच्यामार्फत स्वैच्छिक रक्तदानासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.

मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्याने रक्तदानाची प्रेरणा समाजात दृढ करणे, सुदृढ रक्तदात्यांची फौज उभी करणे, वाढदिवसाला किंवा तीन महिन्यांनी रक्तदान करणे , रक्तदानाची प्रेरणा रक्तदात्यांमध्ये  दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी रक्तदान यज्ञात स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे. समाजाचे जबाबदार घटक या नात्याने समाजात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी,एवढाच उद्देश.


लेखक:-
श्री.हेमकांत सोनार
रक्तपेढी तंत्रज्ञ,

जिल्हा शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग


संपादन:-
मनोज शिवाजी सानप 
जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग
close