shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता मी नंबर डिलीट करणं सोडलंय! ज्येष्ठ पत्रकार मा.श्री. विवेक येवले यांचे मनोगत..!

प्रतिनिधी । सुर्यकांत होनप :
 सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतात तसे माझ्याही मोबाईलमध्ये नातलग-आप्त,मित्र व विविध क्षेत्रातील संबंधितांचे असंख्य नंबर सेव्ह आहेत.त्यापैकी अनेकजणांशी माझा नियमित, बर्‍याच जणांशी कामानिमित्ताने संपर्क आणि शेकडो जणांशी व्हाॅट्सअॅप द्वारे चॅटिंग सुरू असतं.एकूणच स्मार्ट फोनमुळे आता अनेक नव्या-जुन्या नात्यांना, संबंधांना उजाळा मिळालाय हे नक्की ! शिवाय व्हाॅट्सॲप,फेसबुक,ट्विटर वगैरेंमुळे क्षणोक्षणी सगळे अपडेट्स मिळत असल्याने बसल्या जागी  संपूर्ण जगाची हालहवाल समजत राहते.त्यामुळे मोबाईल हा आता अत्यावश्यकच नव्हे तर जीवनावश्यक घटक झालाय.

पण आता मात्र मोबाईल हातात घेणं क्लेशदायी ठरू लागलंय.कारण...पूर्वी मी माझ्या संबंधितापैकी कोणी गेला तर दुःखद भावनेने व मनाने त्याचा काॅन्टॅक्ट नंबर डिलीट करायचो.पण गेल्या वर्षभरापासून मी नंबर डिलीट करायचंच सोडून दिलंय...नंबर डिलीट तरी किती करायचे, रोज किती जणांच्या जाण्याच्या बातम्या ऐकून हळहळत रहायचं...मृत्यूचं हे महातांडव पाहून संवेदनाच गोठून गेल्यात.

जवळचे,लांबचे परिचित,संबंधित...कुणाकुणाचे अकाली,अवेळी,अवचित जाणं हताशपणे पहात रहायचं, अशा दुर्धर प्रसंगी मागे राहणाऱ्या परिवाराच्या सांत्वनासाठी सुध्दा जाता येत नसल्याने अगतिकपणे घरबसल्या उलघालत,तडफडत,मनोमन तुटत रहायचं..
मला नाही वाटतं या आधी कधी कुठल्याच संकटात माणूस इतका हतबल झाला असेल आणि एकमेकांच्या भयाने एकमेकांपासून दुरावला गेला असेल !

पण मी मात्र आता नंबर डिलीट करणं सोडून दिलंय...कुणाकुणाचे नंबर डिलीट करत राहू, कारण मला माझा by मोबाईल आता कोरी पाटी करायचा नाहीये!  
 
विवेक शं.येवले, 
करमाळा.
close