पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जून पासून कागदोपत्री सुरू झाला. परंतु प्रत्यक्षात खेळाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. सामन्याचे दोन दिवस पावसामुळे खेळावर पूर्णपणे पाणी पडलं. दुसऱ्या दिवशी ४० टक्के खेळ वाया गेला. चौथ्या दिवशी एक तास अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळाला बाधा आली. तर पाचव्या दिवशी सुर्य देवता क्रिकेट वर प्रसन्न झाले. वास्तविक कसोटी क्रिकेट पाच दिवसाचेच असते. परंतु या अतिविशेष सामन्यासाठी आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला असल्याने बुधवारी खेळ होईल व त्या दिवशी वरुणराजा विश्रांती घेण्याची मोठी शक्यता असून सुर्य देवता आपला पूर्ण प्रभाव क्रिकेट मैदानावर सोडणार आहे.
या निर्णायक कसोटीचे चार दिवस दोन्ही संघांचे पहिले डावही पूर्ण होऊ शकले नव्हते. परंतु पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जिव तोडून आक्रमण केले. त्याचा लाभ भारताला झाला. मोठी आघाडी घेऊ पाहणाऱ्या न्यूझिलंडला जेमतेम ३२ धावांचा पुढावा मिळाला आणि त्यांचा पूर्ण संघ बाद झाला.
त्यात खास करून मोहम्मद शमी आघाडीवर होता. भारताच्या पहिल्या डावात शमीला शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविल्याचा राग त्याने आल्या आल्या मारलेल्या चौकारावरून दिसला. तसेच कर्णधार कोहली शमीला नेहमी बुमराहा व ईशांत यांच्या तुलनेने दुय्यम वागणूक देतो. शिवाय कोहलीने पाचव्या दिवशीही शमीला उशीरा गोलंदाजी दिली. याचाही राग शमीला असणार ? परंतु शमीने हा सर्व राग कोहलीवर न काढता न्यूझिलंडच्या फलंदाजांवर आग ओकून काढला. त्याला चार बळी मिळाले.
शमीचा जोश पाहून बुजूर्ग गोलंदाज ईशांतही जोमात आला व तीन फलंदाज बाद केले. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज आश्विन व जडेजा यांना जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही परंतु त्यांनीही तीन बळी घेऊन आपली उपस्थिती सिध्द केली. भारताचा हुकमी एक्का जसप्रित बुमराहाचे अपयश भारताला चांगलेच भोवले. जेथे भारताला आघाडी मिळायला हवी होती तिथे ३२ धावांनी भारत पिछाडीवर पडले.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात गचाळ झाली. शुभमन गिल याही डावात लवकर परतला. रोहीत शर्मा (३० धावा ) जम बसल्यानंतरही मोठी खेळू करण्यात कमी पडला. टिम साऊदीला पहिल्या डावात बळी मिळाले नव्हते. मात्र या डावात त्याने घातक मारा करत भारतीय सलामीवीरांना तंबूत धाडले.
सामन्याच्या शेवटच्या ( राखीव ) दिवशी निकाल लागणे अशक्य वाटत असले तरी अवघड नाही. भारताने सुरूवात सावध करून नंतर आक्रमक धावा बनविल्या व न्यूझिलंडला २०० ते २२५ धावांचं लक्ष दिलं तर न्यूझिलंड ते गाठण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. त्या दरम्यान त्यांना बाद करण्याची संधी भारतीय गोलंदाज साधू शकतात.
तत्पूर्वी पुजाराला एक बाजू लावून धरावी लागेल व दुसरीकडून कोहली, पंत व जडेजाने आक्रमक खेळून धावा वाढविल्या पाहिजेत. त्यासाठी अजिंक्य राहाणेला मागे ठेवले तरी चालेल कारण डाव अंगलट येतो असं वाटल्यास राहणे नांगर टाकू शकतो.
तर दुसरीकडे किवीज गोलंदाज भारताचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न करतील व स्वतःसाठी कमीत कमी धावांचं लक्ष घेतील. सध्याचं गणित बघता शेवटचं समिकरणच यशस्वी होण्याची शक्यता असून न्यूझिलंडला पहिला कसोटी विश्वविजेता बनण्याची शक्यता भारतापेक्षा अधिक आहे.
परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून यामध्ये चमत्कार होण्याला मोठा वाव असतो. सामन्याच्या राखीव दिवशी चमत्कार होण्याची मोठी शक्यता वाटते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

