प्रतिनिधी । सुर्यकांत होनप :
करमाळा: दि. ०६/०६/२०२१: बुधवार दि.२/ दुपारनंतर शहर व परिसरात धो-धो पाऊस झाला आणि त्याच संध्याकाळी शहरातील कुंभारवाडा परिसरातील ओढ्याला खूप पाणी आलेले असताना सूर्यकांत मंडलिक या व्यक्तीचा पुलावरून पायी जात असताना पुलावरून तोल गेल्याने वाहणाऱ्या पाण्यात मंडलिक वाहून गेले आणि बेपत्ता झाले.आणि त्या नंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने ताबडतोब जोरदार शोधमोहीम सुरू केली आणि तब्बल दोन दिवसानंतर मंडलिक यांचा मृतदेह त्या ओढ्यात पुढे जवळपास एक कि.मी.अंतरावर एका बाभळीच्या झाडाला अडकलेला आढळून आला.
आणि इथपासूनच पालिकेचा,पदाधिकाऱ्यांचा निर्लज्ज निर्ढावलेपणा समोर आला.मुळात प्रश्न हा आहे की हा माणूस या पुलावरून खाली पडलाच कसा? तो मद्यधुंद अवस्थेत होता त्यामुळे पडला वगैरे युक्तिवाद यासंदर्भात अस्थानी आहेत.कारण या पुलाला दोन्ही बाजूंनी केलेल्या लोखंडी कठड्याचे आडवे रेलिंग कधी काळी गायब झालेले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूला फक्त सुमारे तीनचार फूट उंचीचे लोखंडी पोल तेवढे तग धरून आहेत शहराच्या पश्चिम भागातून कुंभारवाड्यातून शतकानुशतके वाहणाऱ्या या ओढ्यावर सुमारे तीस-चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूंनी उतार असल्याने या पुलावरून जाणारी-येणारी वाहने ही वेगाने जा-ये करत असतात.
अलिकडे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे तसेच शहरातून पश्चिमेकडील हिरववाडी,भोसे,वडगाव,रावगाव तसेच कर्जत आदी गावांना जायला हा सोयीचा मार्ग असल्याने या पुलावरून सतत दुचाकी,खाजगी चारचाकी वाहने व पादचाऱ्यांची वर्दळ असते.त्यामुळे या बिनकठड्याच्या पुलावर कधीही जीवघेणा अपघात होवू शकतो हे लक्षात येण्याइतपत सुज्ञपणा वा शहाणपण पालिकेच्या संबंधितांना कधी नव्हतेच..!
पालिकेने नुकतेच पावसाळापूर्व कामांतर्गत या ओढ्याचे खोलीकरण,स्वच्छता,ओढ्यातील झाडेझुडपे काढण्याचे काम केले होते म्हणे! पण ही कामे करताना पुलाच्या दोन्ही कठड्यांची वर्षानुवर्षे असलेली दुरावस्था मात्र बधिर व लोकविन्मुख पालिका प्रशासनाच्या लक्षात आली नाही हे केवळ पालिकेच्या हलगर्जीपणामुळे बळी गेलेल्या त्या मंडलिकचे दुर्दैवी संचितच म्हणावे लागेल.
यामध्ये आणखी एक शरमेची व निंदनीय बाब म्हणजे या ओढ्याच्या अगदी काठावर पश्चिमेला सत्ताधारी पार्टीच्या विद्यमान नगरसेविका व उत्तरेला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकाचे निवासस्थान आहे.असे असताना या पुलाची ही दुरावस्था असावी यापरते या परिसरातील रहिवाशांचे दुर्दैव आणखी काय असावे?
एके काळी कहाणीतल्या आटपाट,आटोपशीर,सुबक-सुंदर नगरासारखं सुंदर असलेलं हे नगर आजमितीला कमालीचे बकाल,बदसुरत आणि घाणेरडं शहर झालेलं आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे पालिकलाच द्यावं लागेल.काळानुरूप वाढती लोकसंख्या व वाढत्या शहरीकरणामुळे सर्वच शहरांचा विस्तार होत चाललेला आहे.त्याला करमाळा शहराचा देखील अपवाद नाही.पण शहराच्या कक्षा रूंदावत असताना दिवसेंदिवस बकाल,गलिच्छ,बेशिस्त होत जाणारे करमाळा हे बहुदा एकमेव शहर ठरावे किंवा असावे! त्याला कारण म्हणजे अधिकारी,पदाधिकारी व प्रशासनाची सुरू असलेली चमकोगिरी व खाबुगिरी हेच आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये विविध योजनेखाली या पालिकेला मिळालेल्या करोडो रूपये निधीची अक्षरशः कशी वासलात लागलीय आणि लागते आहे याचे संपूर्ण शहरवासीय (मूक ) साक्षीदार आहेत.
रस्ते,कचरा प्रकल्प,नाना-नानी पार्क,दलित वस्ती सुधारणेअंतर्गत विविध कामे,स्वच्छता,घरकुले आदी विविध कामांसाठी येणाऱ्या निधीतून झालेली कामे कशी टाकावू दर्जाची झालेली आहेत हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची गरज नाहीये.विशेष म्हणजे या कामांचा दर्जा तपासण्यासाठी वेगळी एक शासकीय यंत्रणा असते म्हणे! आणि जर कदाचित अशी यंत्रणा असेल तर मग एक तर ती धृतराष्टाप्रमाणे आंधळी तरी असावी किंवा मग ती खाबुगिरीत करमाळा पालिकेला सवाई तरी असावी! असो..!
प्रदीर्घ काळानंतर या तालुक्याला व मतदारसंघाला संजयमामा शिंदेसारखा व्हीजन असलेला व विकासाचा ध्यास घेतलेला आमदार लाभलेला आहे हे जरी सुदैव असले तरी सध्या तरी शहराच्या राजकारणात मामांची अवस्था ही चक्रव्यूहातल्या अभिमन्यूसारखी असल्याचे दिसून येते.त्यामुळे सध्या तरी शहराच्या बाबतीत मामा "नरो वाटते कुंजरो वा ! " अशा द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येते.मागील निवडणुकीत शहरातून त्यांना सहकार्य दिलेल्यांपैकी बर्याच मंडळींचा जीव हा फक्त पालिकेतच अडकलेला असल्यामुळे हे सगळे जरी मामांचे समर्थक असले तरी पालिका राजकारणामध्ये हे सगळे परस्परांचे विरोधक म्हणूनच येत्या निवडणुकीमध्ये आमनेसामने येतील अशी चिन्हे दिसत आहेत.
विशेष म्हणजे यातील बहुतांश मंडळींची राजकीय धाव व वकूब हा पालिकेची सत्ता आणि तीही स्वमहात्म्य व स्वकल्याण एवढाच हेतू ठेवून असल्याने नजीकच्या काळात संजयमामांना शहराच्या सर्वांगीण हिताला प्राधान्य देऊनच धोरण ठरवावे लागेल आणि मामांनी तसे केले तरच ते शहरवासीयांच्या पचनी पडेल.
करमाळा पालिकेच्या या भ्रष्ट,व्यक्तीकेंद्रित,अनागोंदी कारभाराचे पितळ उघडे करण्याचे निमित्त म्हणजे कुंभारवाड्यातील ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याने मंडलिक या व्यक्तीचा झालेला मृत्यू हे आहे.आणि मंडलिक यांच्या या अनैसर्गिक,अपघाती मृत्यूची संपूर्ण जबाबदारी ही केवळ आणि फक्त पालिका प्रशासनाची आहे.
तेव्हा या पुलाच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी व त्यांच्यावर शास्ती बसवून मंडलिक यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच या पुलाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित अधिकारी,पदाधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा...तरच यांची डोकी ठिकाणावर येतील आणि आपण जनतेचे मालक नव्हे तर नोकर आहोत हे गमावलेले भान या नतद्रष्टांना येईल!
विवेक शं.येवले, करमाळा
06/06/2021
मो. ९४२३५२८८३४

