महसूलमंत्र्यांकडे मागणी: कोविडने जगभर अर्थकारणावर मोठा परिणाम..!!
शिर्डी शहर प्रतिनिधी :
शिर्डी शहराला वीज बिलात व सर्व प्रकारच्या करांमध्ये विशेष बाब म्हणून सूट मिळावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना या संदर्भात निवेदन दिले. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ गोंदकर, शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवकचे शहराध्यक्ष अमृत गायके, माजी नगरसेवक सुरेश आरणे, मदन मोकाटे, मोसिन सय्यद, आरबाज
कादरी, सुवरनेश साबळे, आदींची उपस्थिती होती.
कोविडने जगभर अर्थकारणावर मोठा परिणाम केला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारच्या पर्यटन विभागाने हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट व वॉटर पार्क या पर्यटन क्षेत्राला एक वर्षापर्यंत प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट दिली आहे. तसेच वीज बिलामध्ये फिक्स चार्जवर माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत फिक्स चार्ज न आकारता प्रत्यक्षात वीज वापरावरच वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीतही अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे.
शहरे अनलॉक झाली तरी मंदिर बंदमुळे व्यवसाय ठप्प आहेत. गेले सव्वा वर्ष मंदिर बंद असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, बँकांचे कर्ज हप्ते थकले आहेत. उपाययोजना केल्या नाही तर हॉटेल व्यावसायिकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू होण्यास वेळ लागणार नाही. शिर्डीकरांनी यापूर्वीच शिर्डी नगर पंचायतीस प्रॉपर्टी टॅक्समधून सवलत मिळावी म्हणून बहुसंख्येने अर्ज सादर केलेले आहेत.
त्याआधारे शिर्डी नगरपंचायतीने प्रॉपर्टी टॅक्स कमी करावा म्हणून सर्वानुमते ठराव देखीलपारित केलेला असून, महाराष्ट्र शासनाचे नगर विकास खाते यांच्याकडे मंजुरीसाठी दिलेला आहे. परंतु याबाबत महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. शिर्डी हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून विशेष बाबीत समाविष्ट करावे आणि शिर्डीकरांची (घरगुती व व्यावसायिक) सर्व प्रकारची करमाफी करावी. नगरपंचायतकडून प्रॉपर्टी टॅक्स व इलेक्ट्रिक फिक्स चार्ज वसूल न करता सूट देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

