शिरसगाव । वार्ताहर :
भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधांनाची निर्मिती करून लोकशाहीच्या माध्यमातून लोककल्याणकारी कायदे आणले परंतु 71वर्षांनंतरही गावे दुर्लक्षित आहेत.अशा अनुभव जाणिवेतून डॉ. सुभाष वाघमारे लिखित "संविधानाच्या स्वप्नातील गाव "मधील कविता लोकशाही मूल्यांची मागणी करणारी आहे, असे मत साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संसंस्थेचे छत्रपती शिवाजी महाविद्याल्यातील मराठी विभाग आणि पुणे येथील साहित्यविश्व प्रकाशन आयोजित डॉ. सुभाष वाघमारे यांच्या "संविधानाच्या स्वप्नातील गाव "या कवितासंग्रहाचे प्रकाशन ऑनलाईन संपन्न झाले.पिपंरी चिंचवड येथे 2015मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठलराव शिवणकर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये होते, यावेळी ते बोलत होते.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.याप्रसंगी संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,प्रा.डॉ. राजाराम राठोड,प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा.डॉ.माया पाटील,डॉ.योगिता रांधवणे, डॉ.अशोक आढाव,प्रकाशक, कवी विक्रम शिंदे,मुद्रक कृष्णा चिंचकर, वैशाली चिंचकर, मुद्रित शोधक डॉ.संजयकुमार सरगडे, समता प्रतिष्ठान मळोलीचे ग्रामस्थ, सुगत लर्निग सेंटरचे शिक्षक, शिक्षक हितकारिणी संघटना पदाधिकारी, लुम्बिनी संघ सदस्य,चित्रकार नरेंद्र राणे,राज्यातील प्राचार्य, प्राध्यापक, साहित्यिक उपस्थित होते.
डॉ.उपाध्ये यांनी डॉ. सुभाष वाघमारे हेआपले आदर्श, चौकस विद्यार्थी कसे होते. असे सांगून त्यांच्या साहित्य वाटचालीचे अनुभव सांगितले.विधायक, सकारात्मक दृष्टी व गाव समृद्धीची तळमळ असणारी ही कविता असल्याचे सांगितले.
डॉ.श्रीपाल सबनीस यांनी "संविधानाच्या स्वप्नातील गाव "या कवितासंग्रहाचा व डॉ. वाघमारे यांच्या व्यक्तित्वाचे मोठेपण विशद केले.डॉ.वाघमारे हे प्रतिभासंपन्न कवी असून त्यांची प्रज्ञाशीलता, समंजसवृत्ती, संवेदनशीलता, सक्षम समाजजाणिवा,बुद्धाची करुणा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समतावाद त्यांच्या ठायी आहे,लोकल्याणकारी भूमिकेतून ही कविता निर्माण झाली आहे.अशी कविता मराठी साहित्यात प्रकाशित झाली हे भूषणावह असल्याचे सांगून डॉ.वाघमारे यांनी मराठी विश्वाला संपन्न कविता दिलीआहे. कवींची .स्वतंत्र प्रज्ञा येथे आहे. कवीने अनुभवाचे विष पचवून अमृतशब्द समाजाला दिले आहेत.संग्रहाचे मुखपृष्ठ बोलके, आशययुक्त आणि खूप काही सांगणारे आहे.
कर्मवीरांच्या विचारांची दृष्टी येथे आहे.डॉ.उपाध्ये यांच्यासारखे गुरु त्यांना लाभले हे या कवितासंग्रहातून व्यक्त झाले आहे.मराठी साहित्यात अशी दुर्मिळ कविता आलेली आहे, या कवितेचे स्वागत झाले पाहिजे असे डॉ. सबनीस यांनी मत व्यक्त केले.डॉ. सुभाष वाघमारे यांनी आपले खडतर जीवन सांगून ही कविता अनुभवातून आली असल्याचे सांगून रयत शिक्षण संस्थेमुळे आपल्या जीवनाला अर्थ व आकार आल्याचे सांगून माझ्या पहिल्याच कवितासंग्रह प्रकाशनाला मोठा प्रतिसाद लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ.विठ्ठलराव शिवणकर यांनी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या गुणवत्तेचा आणि अभ्यासू वृत्तीचा आढावा घेतला.डॉ.श्रीपाल सबनीस यांच्यासारख्या ज्ञानशील,स्पष्टवक्तेपण असलेल्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व साहित्यिकाच्या शुभहस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.
डॉ.वाघमारे यांचे गुरु डॉ.बाबुराव उपाध्ये प्रमुख उपस्थिती लाभली ह्या सर्वच अभिनंदनीय बाबी असल्याचे सांगून डॉ. वाघमारे यांच्या परिश्रमाचे कौतुक केले.विक्रम शिंदे यांनी प्रकाशक म्हणून मनोगत व्यक्त केले.एक चांगला कवितासंग्रह छापण्याची संधी मिळाली असल्याचे सांगून कर्मवीर कार्याचा प्रभाव सांगितला. प्रा.गजानन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर विक्रम शिंदे यांनी आभार मानले.

