सोलापूर / पंढरपूर :राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती कायम आहे. तसेच, याच काळात यंदा आषाढी वारी असल्याने गर्दीमुळे कोणताही धोका संभवू नये या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपुरात संचारबंदीलावण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर )सह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये 17 जुलै दुपारी 12 वाजल्यापासून ते 25 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी (curfew) जाहीर केली गेली आहे. तसेच, 18 जुलै ते 25 जुलै या कालावधी दरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
यंदाच्या होणाऱ्या आषाढी वारीसाठी वाखरी येथे मनाच्या 10 पालख्या 19 तारखेला येणार आहेत. तेथून प्रतीकात्मक पायी वारीसाठी वीस-बावीस पर्यंत चाळीस-चाळीसच्या 10 गटांत हे वारकरी येणार आहेत. तेथून पुढे प्रत्येक पालखीचे 2 प्रतिनिधी असे एकुण वीस लोक पुढचे साडेचार किलोमीटर पायी चालतं येणार आहेत तर बाकी 380 लोक आपापल्या गाडीमध्ये आपापल्या मठांकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज केल्या आहेत.
सोलापूरच्या ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माहिती दिली आहे की, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार पोलीस सज्ज असणार आहेत.
तसेच, वारीला परवानगी असणारे वारकरी आणि पोलीस यांची कोरोना चाचणी करूनच पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती अधीक्षक सातपुते यांनी दिलीय


