करमाळा / प्रतिनिधी:
करमाळा (दि .२०) : करमाळा तालुक्यातील वांगी नं .३ या ठिकाणी मुस्लीम प्रतिनिधींची आरक्षणा संदर्भात बैठक संपन्न झाली .
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य समस्त मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते तथा प्रवक्ते हाजी इर्शाद भाई अशरफी हे होते.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की , मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नोकरी यामध्ये पाच टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आम्ही समस्त मुस्लिम समाज कायदेशीररीत्या आंदोलन करणार आहोत.
याप्रसंगी त्यांनी सांगितले की , लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य समस्त मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. वेळप्रसंगी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चाचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी बोलताना सांगितले. मुस्लिम समाज हा मागासलेला समाज असून मुस्लिम समाजातील लोक फळ विक्री, भाजीपाला विक्री, पान टपरी, गॅरेज काम, आदी व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यांना आरक्षण देण्यास संबंधी कोर्टानेही मान्य केले आहे तरीसुद्धा सरकार मुग गिळून गप्प बसले आहे.
सरकारला जाग आणण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करू असे आव्हान इर्शाद भाई अशरफी यांनी केले. मुस्लिम आरक्षणासंबंधी करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने तुमच्या पाठीशी राहील असे आश्वासन करमाळा तालुका अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव तथा
मुस्लिम आरक्षण समितीचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी केले.
यावेळी अकलूजचे लालखान पठाण, वजिर इब्राहिम पटेल,करमाळा तालुका ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेचे तालुकाध्यक्ष अलिम वजिर पटेल, जुबेर दूरूगकर, नासिर सय्यद, रमजान मुलाणी, जाफरभाई मुलाणी, बाबूल पटेल, शकूरभाई शेख, महाराष्ट्र राज्य कर्जदार संघटनेचे अध्यक्ष प्रा.गोवर्धन चवरे, तसेच यावेळी करमाळा, माढा, माळशिरस पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, सांगोला मोहोळ आदी तालुक्यातील मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकूर शेख आणि आभार आलिम पटेल यांनी मानले.


