shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (३५)!! पर्यावरण स्तोत्र !!रचनाकार : चंद्रकांत शहासने.

*पर्यावरण जनजागरण (३५)*

*!! पर्यावरण स्तोत्र !!*
*रचनाकार : चंद्रकांत शहासने.*

!! श्री गणेशाय नमः !! 

अनंत कोटी ब्रम्हांडनायक! परब्रह्मम्हणती तयास! 
जयाने निर्मिले ब्रह्मास ! 
परब्रम्ह रचावया !! १ !!

ऐशा ब्रह्मांडाचा जो पसारा! 
त्यात सूर्यादिक ताऱ्यांचा घेरा ! 
नवग्रह आणि आकाशगंगा ! 
परब्रह्मे रचियेली !! २ !!

जयाने रचिले नभोमंडळ! 
आणिक मानवी जीवन!
प्राणी पक्षी वृक्ष अनेक! 
विविध उपयोगाचे !! ३ !!

ज्यांची काय वर्णावी महती! निर्झरासम पवित्र ती मती !
तयांचे कर्तृत्व वृक्षवल्ली !
शोभती जणू सगेसोयरे !! ४ !!

ऐशा सूर्यमालिकेतील एक!
आपले ब्रह्मांड म्हणती तयास!
तेथं येऊन जन्मास! 
देह झिजविले अनेकांनी !! ५ !!

ऋषी तपी आणिक संत! कणाद,भृगू,विश्वामित्र !
दालभ्य,आर्यभट्ट, श्रीहरी !
किती एक ते वर्णावे !! ६ !! 

तयांनी निर्मिले अनेकानेक ग्रंथ!
स्वकर्मे आचरोनी समस्त!
सत्य सांगे उपनिषद !
अध्यात्म सोपान मोक्षाचा !! ७ !!

कलियुगी मोक्षासी कारण!
केवळ आहे पर्यावरण !
तयास टाळता बंधन !
चराचरा होतसे !! ८ !! 

मोक्षास जे कारण! 
पर्यावरण म्हणती तयास! 
नभो मंडळाचे आवरण! 
सर्वांसी पोषक ते !! ९ !!

पर्यावरण मनाचे ! 
पर्यावरण जनाचे!
पर्यावरण नभोमंडळाचे! 
मन आरोग्याची उपकारी !! १० !!

पर्यावरण म्हणजे आवरणं ! 
पृथ्वी सभोवती पांघरूणं!!
उब माया आणिक ज्ञान ! 
आरोग्य शांती देतसे !! ११ !!

ऐशा या पर्यावरणास ! 
संभवतो धोका खास !
विकृत सत्तांधांचा अट्टाहास !
पर्यावरणा बिघडवितसे !! १२ !!

स्वार्थापोटी रसायन निर्मिती! 
दूषिते सोडी जलाप्रती! 
जलचर, मासळी आणि प्राणी!       तडफडून मरतसे !! १३ !!

दूषित जलाने ना पिके शेती! 
वृक्ष फळे ग्रासती !!
फुले पाने झडतसी! 
पक्षीही ना बांधती घरकुले !! १४ !!

रसायने आणि यंत्रे! 
प्रसविती वायू प्रदूषणे !!
पांढरेफटक जाहले चेहरे! 
जिवंतपणी मानवाचे !! १५ !!

रोगराईचे प्राबल्य! 
दमा,क्षय आणि ज्वर !
तरुणपणी मानवजात ! 
वृद्धापकाळ भोगतसे !! १६ !!

कारखान्यातील दूषित कण! 
भेदिती तारांगण ! 
आपसुके पडणारा पाऊस ! 
दूषितही जाहला !! १७ !!

हे केवळ एक प्रदूषण! 
कारखानदारी कारण जयास!
तथापि आणखी अनेक ! 
प्रदूषणे मानवी निर्मिली !! १८ !!

!त्यातील पहिले मनाचे! 
मूळ विकार वासनेचे !!
स्वैराचार, स्वार्थांध लालसेचे ! 
कर्म काय वर्णावे !! १९ !!

दिवसाढवळ्या आक्रमती! 
कित्येकांस ठार मारती !
संपत्ती स्त्रिया आणि संस्कृती!
 दांडगाईने मारतसे !! २० !! 

पर्यावरणा नासवती जन ! 
प्रतिष्ठोनी आपले स्वैराचरण!
विचार, आचार आणि विवेक!    स्वैराचारे नासविती !! २१ !!

पर्यावरणा नासविती सत्तांध ! 
गुलाम करोनि जनांस ! 
इंग्रजे निर्मिले कारकुनांस ! 
तैसेचि नीति आचरती !! २२ !!

पर्यावरणा नासविती मदांध ! 
जुलमानी छळती प्रजेस ! 
कित्येक वंशलतेच्या उच्छेदास ! 
मारक जैसे जाहले !! २३ !! 

पर्यावरणा नासविती सुंदरा! 
देह प्रदर्शनाचा सोहळा ! 
अर्थ आणि प्रतिष्ठा ! 
मिळविती जे कामांध !! २४ !! 

पर्यावरणा नासवती जे धर्माचे ! पर्यावरणा नासवती जे संस्कृतीचे ! तयाकारणे प्रसिद्धी माध्यमे ! 
हमखास चढाओढी करताती !! २५ !!

रिमोट टीव्ही माध्यमे !
पर्यावरणाचे निसविती चाळे!!
घरी बसल्या अवलोकावे !
आपुल्याची दुर्दैवा !! २६ !!

ऐशा या प्रदूषणा ! 
काय उपाय तो जाणा !
परब्रह्माच्या मूळरुपा ! 
तुम्ही-आम्ही विनवावे !! २७ !!

तेव्हा आता उपाय जाणा ! वाचविण्यास पर्यावरणा !
आपली संस्कृती आपण जाणा! जाणावे उपनिषदात !! २८ !!

 जे जे पर्यावरणाचे कामी !
अट्टाहासे कर्मे आचरती !
तयांचे प्रती सामर्थ्य जोडोनी!             आपणही करावा अट्टहास !! २९ !!

ऐसी जयाची कुल करणी ! 
दिलीप होऊनी जे आचरणी!
पर्यावरण ध्यानी मनी ! 
ठेऊनिया आचरती !! ३० !!

तयांचे करोनी कौतुक ! 
आपुले बलं अर्पुनी तयांस !
जे जे उचित नि आवश्यक ! 
साह्य हमखास करावे !! ३१ !!

ऐसे केलीयाचे फळ ! 
रक्षिले जाईल पर्यावरण!
वृक्षवल्ली-फळे फुलांस! 
बिलगतील पक्षी ही !! ३२ !!

रक्षिली जाईल संस्कृती! 
खनिज आणि जलसंपत्ती ! 
नभो मंडळाची व्याप्ती ! 
निरोगी होईल हमखासं !! ३३ !!

 पर्यावरण रक्षणास ! 
होऊ या आता कटिबद्ध ! 
नवीन सहस्त्रकास अभिवादन ! 
करू या पर्यावरण नामे !! ३४ !!

 इतिश्री चंद्रकांत शहासने रचित पर्यावरण विवरण स्तोत्रम संपूर्णं! 

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
मोबाईल क्रमांक: ९८८१३७३५८५
close