एथ वडील जे करिती! तया नाम धर्मु ठेविती ! तेचि येर अनुष्ठिती ! सामान्य सकाळ !!५८!!
हे ऐसे असे स्वभावे! म्हणोनि कर्म न सांगावे!विशेषें आचरावे! लागें संती !! ६० !!
अध्याय तिसरा ज्ञानेश्वरी
वडीलधाऱ्या माणसांनी कसे वागावे याबाबतचे मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊलीने वरील ओवीतून केलेले आहे. सद्यस्थितीत वडील म्हणजे मार्गदर्शन करणारे. आज देशाला ज्या पद्धतीने पर्यावरण साक्षरतेची आवश्यकता आहे त्या संदर्भात विचार केला असता वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही राष्ट्रभक्ती आहे असा संदेश देणारी जी तथाकथित वरिष्ठ मंडळी आहेत आणि जी मंडळी विविध पातळीवर पर्यावरण रक्षणाची कामे करीत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारी ज्ञानेश्वर माऊलीची भूमिका आपण समजून घेणे गरजेचे आहे.
माऊली असे सांगते की, वडीलधारीमंडळी जसे वागतात त्याचेच अनुकरण लहान मुले, सर्वसामान्य जन वागत असतात. तेव्हा श्रेष्ठ मंडळी हो आपण असा आदर्श घालून द्या की त्याचा आदर्श सर्वसामान्य घेतील. थोडक्यात सांगायचं तर साधा चहा! जो नित्यनेमाने घेतला जातो, त्यातून ४० प्रकारचे आजार होतात हे मान्य आहे. पण श्रेष्ठमंडळींनी आपल्या कार्यालयातून चहाऐवजी लिंबू सरबत देण्याची पद्धती सुरू केली तर सर्वसामान्य माणसे देखील ठिक ठिकाणी लिंबू सरबताची मागणी करतील. या योगे सर्वसामान्य माणसांना क जीवनसत्व विपुल प्रमाणात मिळून त्यांची रोगप्रतिकार शक्ती खूप वाढेल.
सर्व श्रेष्ठमंडळी वेळोवेळी सकाळी उठून सूर्य उपासना करतील तर सामान्य माणसेपण सूर्य उपासनेचा आग्रह धरून तसे वागतील. ज्यायोगे त्यांना भरपूर प्रमाणात डी व्हिटॅमिन मिळेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढून ते रोगाचे बळी ठरणार नाहीत. आज रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे ते चुकीच्या सवयींमुळे आहे. तेव्हा चांगल्या सवयी लावणे हे मोठ्यांच्या आचरणातून साध्य होणार आहे असे वरील ओवीतून माऊली सांगतात.
तेव्हा राष्ट्रभक्ती हा त्यागाचा विषय आहे. चंगळवाद सोडणे हा मोठ्यांचा आदर्श असेल तर सामान्य माणसे देखील चंगळवाद सोडून त्यागाच्या भूमिकेतून जगायला लागतील आणि आपल्या देशाला महासत्ता बनवतील.
यासाठी ज्ञानी वडीलधाऱ्या माणसांनी आपले कर्म सतत चांगले ठेवणे आवश्यक असून संतमंडळींनी तर आपले वागणे आचरण विशेष काळजीपूर्वक करायला हवे. पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करण्यासाठी वरील ओवी अत्यंत मार्गदर्शक आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!

