गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ ने संपूर्ण जगाला वेठीस धरले असून या महाभयंकर रोगाने कोटयावधी लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. या मध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश असून सकृत दर्शनी एक गोष्ट जाणवली की कोविड- १९ ने सर्व जगभर समान नागरी कायदा काटेकोरपणे पाळलेला आहे. आपल्या कचाटयात येईल त्याला कोविडने कॅरी बॅग मध्ये पॅक करून ते पार्सल यमसदनी पोहचविले. यामध्ये काही क्रिकेटपटू व त्यांच्या निकटच्या नातलगांचाही समावेश आहे.
कोविड-१९ नंतर त्याची सुधारीत आवृत्ती डेल्टा-३ नेही आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली असून भारतासह युरोपात त्याने मोठ्या प्रमाणात धुडगुस घालायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जगभर या महासंकटाला तोंड देण्यासाठी उपाय योजना सुरू असताना क्रिकेटही तितक्याच धडाक्यात सुरू आहे.
भारत व न्यूझिलंड यांच्यात इंग्लंडमध्ये कसोटी विश्व अजिंक्यपदाचा सामना कोविड विरहीत पार पडला. त्यानंतर भारताचा संघ तिन आठवडयांच्या सुट्टीवर इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत आनंद लुटत आहेत. परंतु हे करताना भारतीय खेळाडू विशेष दक्षता घेत नसल्याचे जाणवते. कारण काही दिवसांपूर्वी रिषभ पंत इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा आस्वाद विनामास्क घेताना दिसला. तसेच बरेच खेळाडूंचे विना मास्क फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
या दरम्यान इंग्लड व श्रीलंका यांच्यात वनडे व टि २० सामन्यांची मालिका खेळली गेली. या दोन्ही मालिकेत इंग्लंडने श्रीलंकेचे कंबरडेच मोडले. तिसरा एकदिवसीय सामना पावसाने अर्धवट राहीला. परंतु दोन्ही मालिका जिंकल्याचा आनंद इंग्लिश खेळाडूंनी बायो बबल बाहेर पार्टी करुन साजरा केला. मात्र हा आनंद त्यांना मोठया दुःखात घेऊन गेला.
इंग्लिश कर्णधार ओएन मॉर्गन, सलामीवीर फलंदाज व यष्टीरक्षक जॉनी बॅरीअस्टो व जलदगती गोलंदाज डेविड विली व सपोर्टींग स्टाफ मधील चार असे एकूण ७ लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाची चांगलीच धांदल उडाली. कारण येत्या आठ तारखेपासून पाकिस्तानविरूध्द त्यांची ३ वनडे व ३ टि२० सामन्यांची मालिका सुरू होत असून त्यांच्या संपूर्ण संघालाच तेथील सरकारच्या नियमानुसार आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून अवघ्या एका दिवसानंतर पाकिस्तान विरूध्द मालिका सुरू होत असल्याने त्यांना तातडीने नवा संघ निवडावा लागला.
एप्रिल २०२१ मध्ये आयपीएल दरम्यान जखमी झालेल्या बेन स्टोक्सला कर्णधार म्हणून इंग्लिश क्रिकेट बोर्डाने तातडीने पाचारण केले असून नऊ नवोदीत खेळाडूंसह अठरा जणांचा संघ निवडला आहे. मालिकेचे दूरचित्रवाणी प्रसारण करणाऱ्या ब्रॉड कास्टींग कंपन्यांना खूष ठेवण्यासाठी इंग्लिश क्रिकेट बोर्डाला मोठी कसरत करावी लागली.
सन २०२० व २०२१ च्या पीएसएल म्हणजे पाकिस्तान सुपर लिग स्पर्धा याच कोरोना व्हायरसमुळे अर्धवट सोडाव्या लागल्या होत्या.नंतर काही दिवसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पाक क्रिकेट बोर्डाने त्या पार पाडल्या.
जगातील सर्वात मोठी लिग असलेल्या सन २०२१ च्या आयपीएललाही कोरोनाची दृष्ट नजर लागली व ती देखील अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली. येत्या सप्टेंबर मध्ये उर्वरीत ३१ सामने युएईमध्ये होणार आहे.
भारत व पाकिस्तानला आपापल्या लिग स्पर्धांसाठी उभारलेले बायो बबल योग्यरित्या सांभाळता न आल्याने या दोन्ही देशांच्या संयोजन क्षमतेविषयी संपूर्ण जगभर शंका घेऊ लागल्या. यामध्ये इंग्लिश मिडीया व प्रसार माध्यमे आघाडीवर होते. परंतु आता त्यांच्याच नियोजनाचे दिवाळे निघाले आहे. बरे झाले पाकिस्तान विरूध्दची मालिका सुरू होण्याअगोदर हे सर्व झाले. अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता.
इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या श्रीलंका संघाच्या कोविड चाचण्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. कारण याच श्रीलंका संघाला भारतासोबत येत्या १३ जुलै पासून वनडे व टि २० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना त्रास होऊ शकतो.
तसेच इंग्लंड दौऱ्यावर असलेला कसोटी संघ ४ ऑगष्ट पासून इंग्लंडविरूध्द कसोटी मालिका खेळणार आहे. सध्या हा संघ सुट्टीवर असून तो विखुरला आहे. परंतु सध्याची इंग्लंडमधील कोविड १९ व डेल्टा ३ यांची परिस्थिती भयावह असल्याने सर्व भारतीय खेळाडूंनी मौज मजा थांबवून तातडीने सुरक्षित ठिकाणी एकत्र जमा होणे गरजेचे आहे. बीसीसीआय तातडीने याबाबत पावले उचलेल अशी अपेक्षा आपण सर्वजण धरूया !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

