shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..!

अहमदनगर:- कोविड-19 मुळे उदभलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने  राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उदभलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्याने त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

 

उत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षीत होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातीचे प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. कोरोना साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची पातळी बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणत्याही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीं द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

 

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमुर्तींच्या विसर्जनाकरीता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.असे स्पष्ट करण्यात आले.    ***
close