----
विकासासाठी निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्यच सरपंचाला पैसे मागत असल्याची पोलिसात तक्रार..!!
सरपंचाने केली सदस्य पैसे मागत असल्याची पोलिसात तक्रार
तुका म्हणे ऐशा नरा......
केज तालुक्यातील 'गोंधळी' ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप म्हणे पैसे द्या नसता विकास काम होऊ देणार नाही..
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याचा गोंधळी कारभार चांगलाच गाजत असून त्याने चक्क महिला सरपंचाकडे "पैसे द्या अन्यथा मी गोंधळ घालीन." अशी चक्क धमकी दिली. त्यामुळे महिला सरपंचाने पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मांगवडगाव येथील सरपंच सौ अनिता प्रताप जाधव यांनी दि. ३० जून रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना एक लेखी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत त्यांची चक्क त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य तानाजी लिंबराज फरके हे त्यांना सतत पैशाची मागणी करीत आहेत. पैसे न दिल्यास या पुढे ग्रामपंचयती मार्फत कोणतेही विकासाचे काम करू देणार नाही. असे म्हणून कमिशन मागत आहेत.
तसेच ग्रामपंचायतच्या सभेत गोंधळ घालण्याची धमकी देत आहेत. त्याच बरोबर खोटे गुन्हे दाखल करण्याची देखील धमकी देत आहेत. सरपंच सौ. अनिता जाधव यांचे पती प्रताप जाधव यांनाही ते वारंवार पैशाची मागणी करीत आहेत. अशी लेखी तक्रार सरपंच सौ.अनिता जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच पैशाची मागणी करणारे ग्रामपंचायत सदस्य तानाजी फरके हे आडदांड व गुंड प्रवृत्तीचे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
दरम्यान या प्रकारामुळे केज तालुक्यातील मांगवडगाव ग्रामपंचायत आणि त्यांचे भ्रष्टारासाठी निवडून आलेले सदस्य चांगलेच बदनाम झाले आहेत.

