प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : (दि .१३) : करमाळा बाजार समितीच्या सचिव निवडीच्या ठरावाला व सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांची स्थगिती मिळाली आहे. यामुळे जगताप गटात मात्र जल्लोष दिसून येत आहे . क्षीरसागर यांचेकडेच सचिव पदाचा चार्ज कायम राहणार आहे .
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेला सचिव निवडीच्या ठरावाला व सभापतींच्या आदेशाला पणन संचालकांनी
स्थगिती दिली आहे . यामुळे सभापती सह बागल गटाला जबर धक्का बसला असून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे . करमाळा बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे यांनी सेवानिवृत्त झालेनंतर सेवा ज्येष्ठता व कायद्यातील तरतुदी नुसार विठ्ठल क्षीरसागर यांचेकडे पदभार सोपविला . परंतु बाजार समितीचे सभापती व बागल गटाला हा पदभार क्षीरसागर यांचेऐवजी पाटणे यांचेकडे सोपवायचा होता . त्यामुळे त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली व २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांचे उपस्थितीत बैठक पार पडली .
या बैठकीत समसमान मते पडून सभापतींच्या निर्णायक मताच्या आधारे पाटणेंचा ठराव मंजुर केला . मात्र या बैठकीत जिल्हा उपनिबंधक यांनी कायद्यातील तरतुदी , नियम, अधिनियम, कर्मचारी सेवानियम आदींबाबत सर्व सदस्यांना अवगत करून तशी नोंद इतिवृत्तामधे केली .
दरम्यान क्षीरसागर यांनी सभापतींच्या पूर्वीच्या आदेशा विरोधात अपील दाखल केले असल्याने सदरची बाब न्यायप्रविष्ठ व प्रलंबित असल्याचे सांगत व सदरचा ठराव माझी सेवाजेष्ठता व पात्रतेवर अन्यायकारक असून चार्ज देणार नसलेची भुमिका घेतली . व तातडीने ठरावाच्या विरोधात देखील दुसरे अपील दाखल केले . यावर ८ जुलै रोजी पणन संचालकांसमोर सुनावणी झाली . यात क्षीरसागर यांनी मागितलेला स्थगिती अर्ज पणन संचालक सतीश सोनी यांनी मंजूर करत सभापतींचा आदेश व बाजार समितीच्या ठरावाच्या अंमल बजावणीस स्थगिती दिली . यामुळे क्षीरसागर यांचेकडेच सचिव पदाचा चार्ज कायम राहणार आहे .
सभापतींचे विधीज्ञ यांनी अपीला वरील सुनावणीत म्हणणे देणेसाठी मुदत मागितली . या प्रकरणात क्षीरसागर यांचे बाजूने अँड अभय इनामदार, सभापतींच्या वतीने अँड सोमण, तर पाटणे यांचे वतीने अँड तोष्णीवाल, राऊत यांनी काम पाहीले . आमचे नेते व बाजार समितीच्या विकासाचे खरे शिल्पकार माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे भक्कम पाठबळ व आशीर्वाद तसेच सर्व सहकारी कर्मचारी यांची खंबीर साथ, व्यापारी बांधव व शेतकऱ्यांच्या शुभेच्छांच्या बळावर हि न्यायाची लढाई आम्ही निश्चितपणे जिंकणार असून आमचा कायदा व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे व न्यायासाठी आमची सामुहीकपणे अविरत व टोकाचा संघर्ष करण्याची तयारी असून " सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजीत नही " असे यावेळी विठ्ठल क्षीरसागर यांनी सांगीतले.

