shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (३७)..! पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे..!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून पर्यावरणाच्या ऱ्हासाची स्थिती का आणि कशी आली यांचे निवेदन केलेले आहे. 

यासी सर्वची असती जबाबदार।
शक्ति, संपत्ती, विचार, प्रचार ।
हे एकहि नाही ताळ्यावर। 
म्हणोनि ग्राम ओसाडले।।

श्रीमंता आपुलें न वाटे काम।
गरीबा उत्पादनाचे नाही प्रेम।
शिक्षिता हीन वाटतो परिश्रम।
यानेच आली शिथिलता ।। 

अत्यंत सोप्या, साध्या मराठी भाषेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात...
एकीकडे आपण म्हणतो की बेकारी वाढलेली आहे पण दुसरीकडे पाहिलं तर देशात कामाचा डोंगर उभा आहे, दारिद्र्य आणि दुःखाचा महापूर आहे, अर्धनग्न, अर्धपोटी लोक अपार आहेत. मात्र त्यांचे दुःख आपल्याला का दिसत नाही. अशावेळी विश्रांती घ्यायला वेळ आहे का? यासाठी निरंतर आणि प्रबळ इच्छाशक्तीचे कार्यकर्ते जर पुढे आले  तर बेकारी कशासाठी राहील.
तर ज्यांना केवळ साहेबगिरी करायची आहे आणि लोकांवर रुबाब चालवायचा आहे, कष्ट न करता फक्त आराम करायचा आहे तेच लोक बेकार राहतात.
शिक्षण घेणारे श्रीमंत आणि मजुरी करणारे गरीब यांच्यामध्ये आळस आणि उदासीनता घरोघरी संसार थाटून बसलेली आहे. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत घरी आळशी होऊन पडायचे हा रोग सगळीकडेच ठाण मांडून बसलेला आहे. कामासाठी कष्ट करायचे नाहीत आणि फक्त तोंडाने वाचाळपणा करायचा आणि जनतेमध्ये गोंगाट भरायचा हे सगळे चुकीचे कामचुकारपणाचे उद्योग जेव्हा समाजामध्ये वाढतात तेव्हा समाजाचे आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय संतुलन बिघडत जाते. 

श्रीमंतांना वाटते मी कशाला काम करू आणि गरीब म्हणतो कष्ट करून मी मालकाला श्रीमंत कशाला करू?  कष्टाची कामे करणे शिकलेल्यांच्या मनाला पटत नाही आणि यामुळे सर्वत्र उदासीनता, शिथिलता पसरते. याचा परिणाम म्हणजे सामाजिक समतोल बिघडतो. आज परिस्थिती अशीच आहे. स्वार्थासाठी ज्याला जे पाहिजे ते जो तो निसर्गापासून ओरबडतो आहे. कारखानदार आपल्या कारखान्यातील दूषित वायू, दूषित पाणी आणि दूषित दुषित वस्तू उघड्यावर कुठेही फेकून देतात आणि वातावरण दूषित करून टाकतात. 


ज्यामुळे पाणीदेखील दूषित झालेले आहे. मद्यालयांचे पेव फुटले असून पाणवठे आटले आहेत.व्यसनांना प्रतिष्ठा मिळाली आणि उपासनेला तिरस्कार मिळतो आहे. अतोनात वृक्षतोड नियोजनशून्य कामे आणि सामाजिक बांधिलकीचा अभाव यामुळे पर्यावरण रक्षण कसे करायचे हीच मोठी समस्या होऊन बसली आहे. परिणामी निसर्गाने विनामूल्य दिलेली शुद्ध हवा, शुद्ध पाणी यासाठी अतोनात आर्थिक बोजा समाजावर पडत आहे.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close