आपल्याला हे माहिती आहे की महाराष्ट्रातील वृक्षाच्छादन केवळ २० टक्के आहे. मानकांनुसार ते ३३ टक्के असणे गरजेचे असते. वनक्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे वृक्षलागवड केली तर हे वृक्षाच्छादन तयार होते. वास्तविक पाहता आपल्याकडे ३३ टक्के वृक्षाच्छादन होईल एवढे वनक्षेत्रही उपलब्ध नाही. यासाठी जिथे जागा मिळेल तिथे वृक्षाच्छादन या हेतूने वृक्षलागवडीची चळवळ जोरात करणे गरजेचे आहे.
मराठवाड्यात परभणी, नांदेड वगळता पावसाचे प्रमाण लहरी आहे आणि वनक्षेत्र ही कमी असून वृक्षांच्छादन खुरटे आहे. दिवसेंदिवस कमी व लहरी पावसामुळे मराठवाड्याचे वाळवंट होईल असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे महापुराचे तांडव असे दुष्टचक्र निर्माण झालेले आहे. वृक्ष अच्छादन आणि दुष्काळाचा थेट संबंध आहे. वृक्षाच्छादीत जमिनीवर पाऊसाचे पाणी थेट न पडता, त्याचा वेग व जोर कमी होऊन पडते. त्यामुळे जमिनीची धूप थांबते.
जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते. जलसंधारण क्षेत्र वाढते. योग्य वन अच्छादन असेल तर पाण्याची पातळी वाढते अन्यथा पाणीटंचाईमुळे दरवर्षी हजारो टँकरद्वारे होत असणारा पाणीपुरवठा आणि त्यावर होणारा करोडो रुपयांचा खर्च याचा फटका जनतेलाच बसतो. वनक्षेत्रात पर्जन्य कमी म्हणून दुष्काळ आणि दुष्काळ आहे त्यामुळे वनक्षेत्र कमी अशा विषचक्रामुळे आपले पर्यावरण असंतुलित झालेले आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात जवळजवळ सत्तर टक्के भूभाग वृक्षाच्छादित आहे, तर रायगड सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी अशा जिल्ह्यांमध्ये 30 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र वृक्षाच्छादीत आहे.
मराठवाड्यात तीन टक्के तर लातूर, उस्मानाबाद, , जालना येथे एक टक्क्यापेक्षा कमी जागेवर वृक्षाच्छादन आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने जिथे म्हणून शक्य होईल तिथे चांगले देशी वृक्ष जसे कडूनिंब,उंबर, वड, पिंपळ अशी झाडे लावावी.
दररोजच्या अंघोळीच्या पाण्यावर एक झाड जरी जगवणे काहीही जड नाही. अर्थात प्रत्येकाने हे युद्धपातळीवर समजून घेणे गरजेचे आहे की वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
चित्र - आंतरजालावरून साभार
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

