कचरा व्यवस्थापन
ग्रामसभेमध्ये एका सुधारणावादी, प्रतिष्ठित नेत्याने विषय मांडला. गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीने निश्चित स्वरूपात काहीतरी आर्थिक बजेट करावे. कचरा गोळा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी. जागोजागी कचराकुंड्या मांडाव्यात.
अशी सूचना आल्यावर यावर चिंतन सुरू झाले. वाहन खरेदीला किती पैसे लागतील! ड्रायव्हरचा पगार किती? गावभर कुंड्या बसवायला किती खर्च येणार ? आणि हा सर्व खर्चसमोर आल्यावर एवढे मोठे बजेट ग्रामपंचायतीला परवडणारे नाही इथपर्यंत चर्चा आली.
तेव्हा एक पर्यावरणप्रेमी समोर आला आणि म्हणाला, या सर्व खर्चाला बगल देऊन आपण संपूर्ण गाव स्वच्छ ठेवू शकतो. आता सगळेजण आश्चर्याने पाहू लागले काहीजण कुचेष्टेने हसले देखील!
पर्यावरण प्रेमीने प्रस्ताव मांडला. प्रत्येक घराने आपल्या घरातील कचरा बाहेर न टाकता आपल्या पससातच जिरवावा. कुठेही अन्यत्र टाकायचा नाही. याचे खत बनवण्यासाठी ग्रामपंचायतीने फक्त कंपोस्टींग पदार्थ पूरवावा. आपल्याच परसात आपण खत तयार करू शकतो. त्याची दुर्गंधी येणार नाही. दर तीन महिन्यांनी ज्यांना शेतासाठी खताची आवश्यकता आहे त्यांनी हे सेंद्रिय खत विकत घ्यावे. ज्यांना खत विक्री करायला जमणार नाही त्यांचे खत विक्री व्यवस्थापन ग्रामपंचायतीच्या मार्फत करावे. तयार सेंद्रिय खत दर तीन महिन्यांनी पंचायतीने जमा करून त्याचा जाहीर लिलाव करावा. हा पैसा आपोआपच शेतकऱ्यांच्या घरात जाईल. समाजकार्यासाठी गावाच्या सुशोभीकरणासाठी, वृक्षारोपण, ग्रंथालये, शाळा, सार्वजनिक शिबिरे, नदी स्वच्छता यासाठी खतविक्रीतून गावकऱ्याला मिळणारी दहा टक्के रक्कम पंचायतीने घ्यावी नि वापरावी.
यातून काय साध्य होईल तर गावकऱ्यांना कचऱ्याचे पैसे मिळतील. शेतामध्ये सेंद्रिय खत टाकल्यामुळे सेंद्रिय धान्य मिळेल. गावात कचरा गोळा करण्यासाठी रोज जी गाडी फिरवायला लागेल त्यातून निर्माण होणारा विषारी कार्बन मोनॉक्साइड निर्माण होणार नाही. पंचायतीला ड्रायव्हरकरिता करावा लागणारा आणि कचरागाडी साठी करावा गावाचा खर्च वाचेल. संपूर्ण परिसर स्वच्छ नि सेंद्रिय होईल. हा विचार सर्वांनाच पटला. तेव्हा गावकऱ्यांनी कचरा व्यवस्थापन समिती तयार करून त्या पर्यावरण प्रेमी युवकाकडे कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली. त्या तरुणाने गावातील तरुणांना एकत्र केले आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक घरामध्ये पर्यावरण रक्षणाचे शिक्षण दिले. आता गावातील प्रत्येक लहान मूल कुठेही कचरा होणार नाही इकडे लक्ष देताना दिसते. हा संस्कार प्रत्येक गावात घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आपल्याला समजली असे म्हणता येईल.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

