पेट्रोल, डिझेल, गैस ची आता दैनंदिन जीवनात रोजची गरज पडते.फेरीवाला पासून तर लॉरीवाला पर्यंत.सिपाई पासून प्राचार्य पर्यंत. पंटर पासून कलेक्टर पर्यंत. पण फक्त कांग्रेस चे लोक विरोध दर्शवतात.जो लोकसभेत दर्शवला पाहिजे तो इकडे रस्त्यावर येऊन दर्शवतात.म्हणजे आम्हाला. जनतेला.पण आम्ही जनता या आंदोलनाला सांस्कृतिक कार्यक्रम समजून पान पलटवतो.जर आम्हाला दरवाढीची झळ पोहचली असती तर आम्हीही कांग्रेस सोबत आंदोलनात उतरलो असतो.आणि ज्यांना झळ पोहचली तरी तो कांग्रेस सोबत आंदोलनात उतरत नाही. का? हा प्रश्न कांग्रेस नेत्यांना कधीच पडत नाही. कार्यकर्त्यांना प्रश्न पडला तरी वरिष्ठांना विचारण्याचे आधिकार नाहीत.
येथे बुद्धीचे वाटप पदाच्या जेष्ठता, श्रेष्ठतेवर अवलंबून असते.म्हणून जनता कांग्रेस सोबत जात नाही. येथे जो जास्त फंडींग करतो त्याचेच म्हणणे लँडींग होते.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गैस चे भाव वाढवले.१००%चुकीचे आहेच.पण त्याविरोधात जे बोलतात, आंदोलन करतात त्यांचेवर जनतेचा विश्वास बसत नाही. बसवला अनेकदा पण उडून जातो,वरच्या वर.त्याची कारणेही तशीच आहेत.
केंद्रात सर्वाधिक जास्त वर्षे कांग्रेस चे सरकार होते.तेंव्हाही पेट्रोल, डिझेल, गैस चे भाव वाढलेच.म्हणून तर भाजप चे कलावंत रस्त्यावर सिलेंडर घेऊन ड्रामा करीत होते.आता त्याच कलावंतांकडून कांग्रेस कलावंतांनी कॉस्ट्युम भाड्याने घेऊन ड्रामा करीत आहेत.भाजपचे ते कलावंत सरकार मधे मंत्री आहेत.आमच्या समोर प्रश्न इतकाच कि,यांचा ड्रामा जास्त ग्रीप पकडतो कि त्यांचा?
पत्रकार हेच टिपतात कि,टीआरपी कोण वाढवू शकतो?भाववाढ झाल्याचे जास्त सोयरसुतक जनतेला नाही. पत्रकारांना नाही.त्याची सबळ कारणे आहेत.
कांग्रेस चे सरकार मधे मंत्री नव्हे साधा आमदार किंवा खासदार कडे इतकी वारेमाप संपत्ती आली कोठून?शेतीमाल विकला का?किराणा दुकान चालवले का?ट्युशन चालववली का?मग,माल आला कोठून?हे जनतेला ज्ञात झालेले आहे कि,ही संपत्ती म्हणजे सरकारने जनतेसाठी दिलेल्या निधीतून परस्पर वळवळेले पाणी.
गांधीजी , किंवा आण्णा हजारे आंदोलन करीत तेंव्हा आख्खा भारत त्यांच्यामागे उमडत असे.का?त्यांचेकडे शाळा,कॉलेज, पतपेढी, कारखाना ,पेट्रोल पंप वगैरे नाही. सहज मिळाले असते पण घेतले नाही. नेमके हेच पथ्य कांग्रेस नेत्यांनी पाळले नाही. हेच पथ्य भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी च्या नेत्यांनी पाळले नाही. सरकारी निधीच्या नदीला बांध घालून पाणी तुमच्या शेतात वळवले.आता अलिकडच्या कोरड्या रेतीत तुम्ही आंघोळ करीत आहात.हे कितपत खरे आहे?हे तर नाटक आहे.ही तर फसवणूक आहे.म्हणून सामान्य जन सहभागी होत नाहीत. बुडत्याला कळले कि,जीव वाचण्यासाठी साप धरावा कि दोर?
आता राजकीय आंदोलनाचे हेतू,स्वरूप बदललेले आहे.परवा राष्ट्रवादी चे जळगाव ला आंदोलन झाले. हेतू होता कि, इडी ने खडसेंची चौकशी करू नये.कारण अपहार, भ्रष्टाचार करण्याचा त्यांना घटनादत्त आधिकार आहे.आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.न्यायाधीश सुद्धा त्यांना शिक्षा देऊ शकत नाही.तर मग,इडीने का चौकशी करावी? अशा उद्देशाने आंदोलने होत असतील तर मेरा भारत म्हणतांना जीभ चावली जाईल.आमच्या जळगाव च्या मुलांना, तरूणांना आम्ही कोणाचा आदर्श सांगावा? हा असा,जैन आणि खडसेंचा?
नागरिक या आकलनापलिकडे गेलेला आहे.असा विचार करण्याचे नैतिक भान हरवून बसला.म्हणून तो मुकबधीर होऊन या आंदोलनाकडे पाहात आहे.
पेट्रोल, डिझेल, गैसची दरवाढ करू नये.अशी मागणी जेंव्हा सामान्य माणूस म्हणजे मजूर,रिक्षावाला, टैक्सीवाला,फटफटीवाल,ट्रकवाला,ट्रैक्टरवाला करील.आणि त्याच्या सोबत दुकानदार, कारखानदार,व्यापारी, आधिकारी,कारकून,शिक्षक उतरेल तेंव्हा केंद्र सरकार ताबडतोब दरवाढ कमी करील.असा प्रयोग जयप्रकाश नारायण, आण्णा हजारे यांचा आम्ही आंखोदेखा पाहिलेला आहे.आणि परिणाम सुद्धा!

