पर्यावरणाचे संतुलन करण्यासंदर्भात नक्षत्र वन या संकल्पनेतून मेष राशीत असलेल्या पहिल्या अश्विनी नक्षत्राचा वृक्ष कुचला (Strychnos-nux-vomica) हा मध्यम आकाराचा हा वृक्ष असून याचे सर्व भाग कडू असतात.
पश्चिम घाट आणि किनारपट्टीच्या भागात हा वृक्ष आढळतो. कोकणातील लाल माती आणि वालुकामय जमीन या झाडास मानवते. या झाडाची साल पातळ पिवळट करड्या रंगाची तर लाकूडही वाळवी न लागणारे, चवीला कडू आणि खूप वर्षे टिकणारे असते. कुचला या झाडाची फुले फेब्रुवारी मार्चमध्ये फुलतात. हिरवट पांढऱ्या रंगाची असतात, याला हळदी सारखा वास येतो.
कुचलाची फळे साधारण पाच सेंटीमीटर व्यासाची नारंगी लालसर रंगाची असतात. यात तीन चार बिया असतात. गर पांढरा असतो. गरात १.२५ ते १.५०टक्के स्ट्रिकनीन मिळते. फळेदेखील कडू असतात यामधील पांढरा गर धनेश पक्षाला आवडतो. कुचलाची पाने अंडाकृती पाच शिरा असलेली आणि यातील तीन शिरा ठळकपणे दिसणाऱ्या अशी असतात.
कुचला ही वनस्पती इसब, सांधेदुखी, नपुंसकता, अवेळी झोपेत लघवी होणे, हिस्टेरिया, अर्धांगवात, झोप, भूक आणि शरीरशैथिल्य या विविध रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे. ही वनस्पती कडू तसेच विषारी असल्यामुळे याचा वापर करताना निष्णात वैद्याचा सल्ला आवश्यक असतो. शक्यतो याचा वापर बाह्यांगावर करावा. या झाडाचे औषध अतीप्रमाणात पोटात गेल्यास दहा मिनिटात अर्धांगवातासारखे झटके येतात. तेव्हा देशीगाईच्या दुधात देशीगायीचे तूप मिसळून ते त्या प्यावयास द्यावे. पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने हे झाड अत्यंत महत्त्वाचे आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
चित्र आंतरजालावरून साभार
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
#कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने #पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

