दर चार वर्षांनी होणारा जगातील सर्वात मोठा क्रिडा महोत्सव ऑलिंपिक कोरोनाच्या महाभयंकर संक्रमणामुळे एक वर्ष उशीराने सुरू झाला. वास्तविक सन २०२० मध्येच टोकीओ येथे ही स्पर्धा होणार होती. २३ जुलैला एका रंगारंग कार्यक्रमात या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि दुसऱ्याच दिवशी भारतीय महिला भारोत्तोलक मिराबाई चानू हिने ४९ किलोग्रॅम वजनी गटात चिनी प्रतिस्पर्ध्याला कडवी लढत दिली.
मिराबाईला ऑलिंपिक विक्रमासह सुवर्ण पदक मिळविण्याची संधी होती. परंतु अंतिम फेरीत तिचा ११७ किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयोग फसला आणि भारताचे सुवर्णपदक हुकले. चानूच्या चिनी प्रतिस्पर्धी खेळाडूने ११६ तर चानूने ११५ किलो वजन उचलले तर क्लिन व जर्क मिळून तिने २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवून चालू ऑलिंपिकमधील भारताचं पदकांचं खातं उघडून चमत्कार घडविला. वेल डन चानू ! महाभिनंदन !!
भारताचे दोन क्रिकेट संघ सध्या परदेश दौऱ्यावर आहे. त्यापैकी इंग्लंडमध्ये कसोटी संघ पाच कसोटी खेळणार आहे. तर दुसरा संघ श्रीलंकेत वनडे व टि-२० मालिका खेळत आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संघाला ४ ऑगष्टपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी अभियान सुरू करायचे आहे. परंतु इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या कसोटी संघातील खेळाडूंना कोरोना व्हायरस व दुखापतींनी सतावले आहे.
१८ ते २३ जून दरम्यान भारताने न्यूझिलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपदाचा सामना साऊथॅम्पटन येथे खेळला. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ४३ दिवसांचा गॅप होता. त्यातील पहिले २१ दिवस भारतीय खेळाडूंना मौज करण्यासाठी सुट्टी देण्यात आली. त्या सुट्टी काळात खेळाडूंनी विविध प्रकारे आनंद लुटला. काही जण विम्बल्डन टेनिस, युरो कप फुटबॉल स्पर्धा बघायला गेले. मात्र कोणीही कोविड-१९ व डेल्टा व्हेरिएंट या रोगांचे गांभिर्य लक्षात न घेता विना मास्क व सोशल डिस्टन्स न पाळता मन मानेल तसे वागत होते. शेवटी व्हायचे तेच झाले.
यष्टीरक्षक रिषभ पंत, वृध्दीमान साहा, राखीव फलंदाज अभिमन्यू ईश्वरन, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण व थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाले. त्या सर्वांवर वैद्यकिय उपचार करण्यात आले. त्यानंतर इंग्लिश कौंटी इलेव्हन विरूध्द झालेल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर व नेट गोलंदाज आवेश खान गंभीर जखमी झाले व दौऱ्यातून बाद झाले. विशेष म्हणजे आवेश व सुंदर भारताकडून नव्हे तर कौंटी संघाकडून खेळत होते. तत्पूर्वी विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळताना सलामीवीर शुभमन गिल जखमी झाल्याने आधीच मायदेशी परतला आहे.
या तीन खेळाडूंना पर्याय म्हणून तीन बदली खेळाडू पाठविण्याची विनंती इंग्लंड दौऱ्यावरील संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला केली असून श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करत असलेले खेळाडू पृथ्वी शॉ व सुर्य कुमार यादव भारतात असलेला अष्टपैलू खेळाडू जयंत यादवची मागणी केली आहे. प्राथमिक माहिती नुसार बीसीसीआयने पृथ्वी व सुर्याच्या नावाला मंजूरी दिल्याचे समजते. जयंत यादवची निवड कॉरंटाईन व इतर काही कारणास्तव मागे पडल्याचे दिसते. सुर्या व पृथ्वी लवकरच इंग्लंडला रवाना होणार असून तेथील कॉरंटाईन नियम पाळून ते संघात सामील होतील.
दुसरीकडे कोरोना व क्रिकेटचा ३६ चा आकडा कायम आहे. वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ जुलै रोजी वनडे मालिकेतला दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला जाणार होता. परंतु सामन्याचे नाणेफेक झाल्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी काही मिनिट अगोदर वेस्ट इंडिज संघाच्या सपोर्टींग स्टाफ मधील एक सदस्य कोरोना बाधीत झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर तातडीने तो सामना स्थगित केला गेला व दोन्ही संघांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी तो सामना आहे तसाच खेळला गेला. विंडीजने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिकेत बरोबरी साधली.
ऑलिंपिक व क्रिकेट जोरात सुरू असून कोरोनाचा प्रभाव जराही कमी झाल्याचे दिसत नाही तरी प्रत्येकाने शासन व आरोग्य विभाग यांनी आखून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

