पुणे । प्रतिनिधी : पुणे शहरातील 'सायक्लोहोलिक्स' च्या नऊ सायकलपटूंनी ४५८ किलोमीटरची 'सायक्लोहोलिक्स फिटनेस वारी' करून अनोख्या पद्धतीने पांडूरंगा चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक सायकल रायडिंग कार्यक्रमात 'सायक्लोहोलिक्स' चे सायकलपटू सहभागी असतात. काहीतरी वेगळे करण्याची कल्पना सदस्यांना सुचली.
आपल्या 'सायक्लोहोलिक्स' च्या व्हाट्सअप ग्रुपवर 'फिटनेस वारी' रात्री ७ ते सकाळी 9 या वेळेत सायकल वारी करायची भन्नाट कल्पना मांडली.या सायकल वारी चा थ्रिल अनुभवण्यासाठी 'सायक्लोहोलिक्स' चे सदस्य( संजय कंकवाडी, मनीष महाजन , हरदेश दालसे , कुणाल करंजकर , रुपेश पोटे, अजित घुले, सचिन बोटे, डॉक्टर सचिन बाविस्कर आणि सम्राट रावते) लागलीच तयार झाले.
आळंदीहुन शुक्रवारी (ता. ९ जुलै ) संद्याकाळी ७ वाजता ते निघून हडपसर, लोणीकाळभोर आणि मग पुणे सोलापूर महामार्गावरून यवत , पाटस , कुरकुंभ , भिगवण , इंदापूर , टेंभुर्णी , करकंब आणि पंढरपूर असा २२७ किलोमीटरचा प्रवास शनिवारी ( ता. १० जुलै) सकाळी ९ वाजता त्यांनी पूर्ण केला. आळंदीहुन पंढरपूरच्या सायकल प्रवासात लोणीकाळभोर ते इंदापूर या प्रवासात जोरदार पाऊसाचा ६-७ तास सामना करावा लागला.सायक्लोहोलिक्स''च्या सायकलपटूंनी पाऊसाचा आनंद घेत सायकल वारी पूर्ण केली.
दुपारी १ वाजता नामदेव पायरी आणि चंद्रभागेचे दर्शन घेऊन ३-४ तासाचा आराम करून आळंदीचा प्रवास शनिवारी ( ता. १० जुलै) ७ वाजता सुरु केला. रात्र भर सायकल प्रवास करून रविवारी ( ता. ११ जुलै) सकाळी १० वाजता सायक्लोहोलिक्सचे सायकलपटूंनी आळंदी येथे पोहोचले.
'सायकलिंग करा, फिट राहा 'असा संदेश देत सायक्लोहोलिक्सच्या सायकलपटूंनी केलेल्या फिटनेस वारीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

