महिलांच्या आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या जगभरातील चळवळींचा मलाला एक चेहरा - अंकिता पाटील
इंदापूर प्रतिनिधी:नोबेल पुरस्कार विजेती, जगातील सर्वात तरूण शांतीदूत मलाला युसुफझाई हीचा आज वाढदिवस. संयुक्त राष्ट्र संघाने लहान मुलाच्या सन्मानार्थ तिचा वाढदिवस मलाला दिन म्हणून घोषित केला आहे. आज बावडा येथे जिजाऊ फेडरेशनच्या वतीने लहान मुलींच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केक कापून मलाला डे साजरा केला तसेच त्यांच्याशी विविध विषयावर संवाद साधला.
अंकिता पाटील म्हणाल्या की,' दरवर्षी १२ जुलै हा दिवस जगभरात 'मलाला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या जगभरातील चळवळींचा मलाला एक चेहरा आहे. मलालाला शांततेचा २०१४ सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा, हे मलालाचे युसूफझाईचे उद्दीष्ट आहे.'

