shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(५०)..! पंचमहाभूते आणि आत्मपरीक्षण...!!



पर्यावरणाच्या समतोल तत्त्वाचा विचार करताना पंचमहाभूतांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायु, तेज, आप, पृथ्वी. पंचमहाभूते ज्या क्रमाने लिहिलेली आहेत त्याच प्रमाणे निर्माण झालेली असून दुसऱ्यात पहिले व तिसऱ्यात दुसरे व पहिले असते. 

पृथ्वी तत्व हे सर्व महाभूतांनी व्यापलेले आहे. आता पाहा, वनस्पती मातीतून अन्न घेतात. म्हणजे माती हे वनस्पतीचे अन्न आहे. आपण स्वतः कधी माती खाल्ली आहे का?  नाही! पण आपण वनस्पती खातो, म्हणजे वनस्पतींनी मातीतून शोषलेले अन्न आपण खातो. पण याचे मूळ कारण हे मातीच आहे. अशा रीतीने सर्व जीव हे मातीवरच अवलंबून असून माती हे पंचमहाभूतांचे मिश्रण आहे. या अर्थाने सर्व प्राणिमात्रांचे अन्न म्हणजे पंचमहाभूते.

प्राण हा देखील पंचमहाभूतांचा आहे. सर्व जीवांमधे प्राण आहे, म्हणजेच प्रत्येक प्राण्यात आकाश, वायु, तेज, आप,  पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. एकपेशीय सूक्ष्मजीव असो अथवा प्रचंड शरीराचा प्राणी असो,  वृक्ष असो प्रत्येकामध्ये प्राण असतोच. आणि प्राणतत्व अन्नापासून तयार होते.

जिथे जिथे प्राण आहे तिथे तिथे मन आहे. प्राण नसेल तर संवेदना नाही आणि संवेदना नाही म्हणजेच मन नाही. एखाद्या प्राण्यात मन विकसित झालेले नसेल पण मन हे असतेच. वनस्पती, जलचर, पक्षी यापेक्षा कदाचित मानवाचे मन प्रगत असेल पण हे सर्व प्राण असेल तरच.
प्राणापासून मन आणि मनापासून सत्य निर्माण होते. कारण जिथे मन आहे तिथे सत्य असत्याचा सहवास आहे. जी गोष्ट मला सत्य वाटत असेल ती कदाचित दुसऱ्याला असत्य वाटेल. पण हे असे वाटणे हे सत्य आहे.

म्हणजेच मनापासून सत्याची निर्मिती होते. पर्यावरणाचे रक्षण करणे, राष्ट्रीय संपत्तीचा कल्याणकारी वापर व्हावा हे मला चांगले वाटत असेल तर कदाचित दुसऱ्याला पर्यावरणाचा विनाश करत स्वतःसाठी संपत्ती जोडणे हे चांगले वाटत असेल. हा तर मनाचा खेळ आहे. तेच तर आपण अनुभवतो आहोत की मनाच्या स्वार्थी, चंचलतेमुळे अगदी निसर्गाने दिलेले शुद्ध पाणी नदी-नाल्यातून जाताना आपण कसे दूषित केले आणि आज विकतचे पाणी कसे पित आहोत. या सत्य असत्याच्या अभ्यासाला आत्मपरीक्षण असे म्हणायला हवे. पर्यावरण रक्षणासाठी आत्मपरीक्षण गरजेचे आहे.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close