भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून त्या संघाला कोरोना व्हायरस व दुखापतींनी घेरलं असून इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेते पदाचा प्रबळ दावेदार मानले गेलेल्या भारताला न्यूझिलंडकडून पराभवाचा जोरदार झटका बसला. त्या पराभवाचे मुख्य कारण होते भारताची निष्प्रभ ठरलेली फलंदाजी. त्या कसोटीत भारताच्या कोणत्याच फलंदाजाला दोन्ही डावात सातत्यपूर्ण खेळी न करता आल्याने भारताला न्यूझिलंड समोर शरणागती पत्करावी लागली होती.
त्याच बरोबर त्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिल जायबंदी झाला व मायदेशी परतला. तसेच इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद उपभोगत असताना रिषभ पंत, वृध्दीमान साहा, अभिमन्यू ईश्वरन हे प्रमुख खेळाडू कोरोना व्हायरसचा सुधारीत प्रकारात डेल्टा व्हेरिएंटचे बाधीत आढळले, तसेच आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर हे गोलंदाज जखमी झाल्याने संघ व्यवस्थापनाला संघात आणखी काही खेळाडूंची कुमक भारतातून मागविण्याची गरज भासली, सुरुवातीला बीसीसीआयने हा प्रस्ताव धुडकावला होता. मात्र नंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बीसीसीआयने सलामीवीर पृथ्वी शॉ व मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवला इंग्लंडला पाठविण्यास अनुमती दिली.
१४ सप्टेंबर १९९० मध्ये मुंबईत जन्म झालेला मुळचा उत्तर प्रदेशातील गाझीपूरचा रहीवाशी असलेला सुर्यकुमार अशोक यादव हा वडिल अशोक यादव मुंबईमध्ये भाभा एरॉनॉटीकल रिसर्च सेंटर मध्ये इंजिनियर म्हणून नोकरीस असल्याने मुंबईतच स्थायिक झाला. सुरुवातीला चंद्रकांत पंडित व कामत या प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण घेतलेल्या सुर्याने आपल्या अपार मेहनत व गुणवत्तेच्या बळावर आयपीएल, मुंबई रणजी संघात स्थान मिळविले.
बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने चेंडूमध्ये ४३ चेंडूमध्ये नाबाद ७९ धावांली खेळी साकारली. १० चौकार आणि ३ षटकारांसह सूर्याने फिनिशरची भूमिका निभावत मुंबईला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्या सामन्यात भारताचा व आरसीबीची कर्णधार विराट कोहलीने सुर्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी स्लेजिंगचाही वापर केला, परंतु सुर्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. सुर्यकुमार आणि विराटचा मॅच दरम्यानचा फोटो आणि मॅचनंतरचं सूर्यकुमारचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्याची मोठी सहानुभूती सुर्याला मिळाली होती. मागील एक दशक रणजी करंडक, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, इंडिया ए, आयपीएल अशा विविध स्पर्धांमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सुर्याने भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची कसर सोडली नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी डावलेल्या सुर्याने निराश झाल्यानंतरही जिद्दीने लढाई सुरूच ठेवली व इंग्लंडविरूध्द टि२० संघात स्थान मिळविले. आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरूवात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून करणाऱ्या सुर्याने दमदार अर्धशतक ठोकले. त्यानंतर आणखी एका सामन्यात ३७ धावांची वादळी खेळी केली. नंतर श्रीलंकेविरूध्द वनडेत नाबाद ३१, ५३ व ४० धावा ठोकून मालिकावीर ठरला. मग पहिल्या टि-२० मध्ये ५० धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
जिद्द, जिगर, मेहनत व प्रचंड आत्मविश्वास असलेल्या सुर्याकडे क्रिकेटच्या पुस्तकात असलेले सर्व फटके असून त्याचा तो मैदानात खुबीने वापर करतो. जलद व फिरकी मारा तो सहज रित्या खेळू शकतो, तसेच त्याचे पदलालित्य अफलातून आहे.त्याचा फॉर्म व खेळातील सातत्य बघून तसेच संघाची गरज ओळख इंग्लंड दौऱ्यावरील संघ प्रबंधनाने सुर्याला इंग्लंडला पाचारण करण्यासाठी बीसीसीआयला गळ घातली व बीसीसीआयने ती उचलून धरली.
भारतातील माजी दिग्गज खेळाडू, पाकिस्तान व जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व तज्ञांच्या मते सुर्या आजमितीला विराट कोहली व रोहीत शर्मा नंतर भारतातील सर्वात परिपक्व खेळाडू असून तो भारतासाठी उच्च दर्जाची कामगिरी करू .
सुर्याचे कसोटी खेळण्याचे स्वप्न इंग्लंडमध्ये साकार होईल अशी अपेक्षा असून कर्णधार कोहलीने आतापर्यंत डावललेला सुर्या त्याच्या पुढील प्लॅनचा प्रमुख घटक ठरू शकतो म्हणून कोहली सुर्याला भारताच्या सर्व प्रकारच्या संघात खेळविण्यास राजी झाला आहे. चला तर आपण सुर्याला भावी कारकिर्दीस भरभरून शुभेच्छा देऊ या !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

