shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीलंकेत भारताचा नवा संघ करणार शक्तीप्रदर्शन..!!

कोरोना संक्रमण काळ ऐन जोरात असताना क्रिकेटनेही आपला जोर कमी होऊ दिला नाही. जगातील अनेक क्रिकेटपटूंना कोविडने त्रस्त केले असून आयपीएल, पीएसएल सारख्या स्पर्धा कोरोनामुळे स्थगित कराव्या लागल्या. तर काही देशांना आपले आंतरराष्ट्रीय दौरे रद्द अथवा स्थगित करावे लागले. त्याच पार्श्वभूमिवर टि -२० ची ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा युएईत हलविली आहे. तसेच ४ मे रोजी स्थगित केलेली आयपीएल ही या विश्वचषक स्पर्धेपूर्वी युएईतच होणार आहे. 

                      



भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने बीसीसीआयने आगामी टि-२० विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून सफेद चेंडूच्या खेळातील निष्णात व संभावित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा सराव व अभ्यास होण्यासाठी श्रीलंकेविरूध्द ३ वनडे व ३ टि२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे.

                     

श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्याहून परतला असून त्यांच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर तसेच व्हिडीओ अनॅलिस्ट निरोशन कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण संघालाच आयसोलेशन करावे लागले. त्यामुळे मुळ कार्यक्रमानुसार १३ जुलै पासून सुरू होणारे हे सामने ५ दिवस पुढे ढकलले आहे. आता १८ जुलैपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने प्रत्यक्ष खेळाला सुरूवात होईल.

                      

एकेकाळी भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ राहीलेल्या व विद्यमान एनसीए प्रमुख राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताचा २० मुख्य व पाच राखीव खेळाडूंचा संघ दौऱ्यावर आहे. वीस जणांच्या संघातील १४ खेळाडू क्रिकेटच्या तीन पैकी किमान एका तरी प्रकारात भारताकडून खेळलेले आहेत. त्यामुळे भारताचा हा संघ दुय्यम दर्जाचा नसून सफेद चेंडूच्या खेळातील एक्सपर्ट खेळाडू या संघात समाविष्ठ आहेत. तर उर्वरीत सर्वजण भविष्यातील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची पात्रता बाळगून आहेत.

                        

तीन एकदिवसीय सामने १८, २० व २३ जुलैला तर तीन टि २० सामने २५, २७ व २९ जुलैला होणार आहेत. सर्व सामने कोलंबो स्थित प्रेमदासा स्टेडीयमवर खेळले जाणार आहेत. शिखर धवन हा डावखुरा फलंदाज भारताचे या मालिकांच्या माध्यमातून प्रथमच नेतृत्व करणार आहे तर अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या श्रीलंकेचे नेतृत्व गेल्या ४ वर्षात करणारा दासुन शनाका हा लंकेचा दहावा कर्णधार आहे.

                        

भारत व श्रीलंका या दोन संघात आजवर झालेल्या एकदिवसीय सामन्यांचा विचार केला तर भारताचे पारडे वरचढ राहीले आहे. आतापर्यंतच्या १५९ पैकी ९१ सामन्यात भारत तर ५६ सामन्यात श्रीलंका विजयी झाले. तर एक सामना टाय झाला तर ११ सामने निकालाविनाच निकाली निघाले.

                         

ज्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हे सामने होणार आहेत त्या मैदानावर यजमान श्रीलंकेपेक्षा पाहुण्या भारतीय संघाची कामगिरी उजवी आहे. सन २००९ म्हणजे १२ वर्षापूर्वी श्रीलंकेच्या संघाने भारतावर या मैदानात विजय मिळविला आहे. त्यानंतर या मैदानावर हे दोन संघ पाच वेळा आपसात झुंजले परंतु प्रत्येक वेळा भारताने बाजी मारली आहे. नुकत्याच इंग्लंड दौऱ्यात श्रीलंकेची वनडे व टि २० मध्ये अतिशय निराशाजनक कामगिरी झाली आहे. तसेच श्रीलंकन क्रिकेटमध्ये अंतर्गत वातावरण अस्थिर असल्याने खेळाडू देखील निश्चिंत नाहीत.

                           

दोन्ही संघांची तुलना केल्यास भारताचा संघ प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार असला तरी श्रीलंकेच्या सध्याच्या मुख्य संघापेक्षा भारताचा संघ अनेक पट वरचढ दिसतो. परंतु प्रत्यक्ष सामन्यात जो संघ चांगला खेळेल तो भक्कम गणला जाईल. 

                          

उपलब्ध खेळाडूंपैकी पहिल्या वनडे सामन्याच्या अंतिम अकरा जणांच्या संघात जागा मिळविणारे संभावित खेळाडू असे असू शकतात. शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, संजू सॅमस ( यष्टीरक्षक ), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार ), दिपक चाहर, कुलदिप यादव, युजवेंद्र चहल.

                                      

भारत ही मालिका निर्भेळपणे जिंकेल असं सकृतदर्शनी दिसतेय. मात्र श्रीलंका संघ मायदेशात खेळत असल्याने वातावरण, खेळपट्टी व परिस्थितीचा लाभ उठवून भारताला धक्का देऊ शकतात.  या दोन्ही संघात तुल्यबळ लढत व्हावी अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे. चला तर बघूया कोणात किती बळ आहे ?


लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close