* आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर कुटुंबीयांची राजवर्धन पाटील यांनी मुंबई येथे घेतली भेट..!
*हर्षवर्धन पाटील यांनी फोनद्वारे केली वैभव निंबाळकर यांच्या तब्येतीची चौकशी*
इंदापूर प्रतिनिधी: आसाम पोलीस दलात कछार जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे इंदापूरचे सुपुत्र आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर हे सीमारेषेवर झालेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती काल रात्री मुंबई येथे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली आहे. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी आज मुंबई येथे आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व काळजी घेण्याची विनंती केली. दरम्यान राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वैभव निंबाळकर यांचे वडील चंद्रकांत निंबाळकर यांना फोनद्वारे संपर्क करीत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच काळजी घेण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले.
आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर हे इंदापूर तालुक्यातील सणसर गावचे असून ते 2009 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना आसाम केडर मिळाल्याने तेव्हापासून ते तिथेच कार्यरत आहेत. आसाम व मिझोराम सीमेवर झालेल्या गोळीबार व दगडफेकी मध्ये वैभव निंबाळकर यांना पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत.
राजवर्धन पाटील यांनी मुंबई येथे निंबाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. वैभव निंबाळकर हे देशासाठी सेवा देत आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजवर्धन पाटील यांनी दिली.

