shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बनावट कागदपत्रे सादर करुन बनवले जाताहेत दस्त .. वसीम शेख यांनी पत्रकार परिषदेत इंदापूर येथे केला खुलासा.

बनावट कागदपत्रे सादर करुन बनवले जाताहेत दस्त .. वसीम शेख यांनी  पत्रकार परिषदेत इंदापूर येथे  केला खुलासा.   


इंदापूर : बोगस कागदपत्रे सादर करुन इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयातून   दस्त बनवला गेला असल्याचा आरोप इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते वसिम नजीर शेख रा. इंदापूर यांनी  (दि.१५ जुलै २०२१) रोजी या दस्तासंदर्भात सबळ पुरावे देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना सादर केले आहेत. वसिम शेख यांच्याकडे यासंदर्भातील सबळ पुरावे लागल्यानंतर  हा  प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त बनवला गेल्याची गोपनीय माहिती वसिम शेख यांना दि.१५ मार्च २०२१ रोजी मिळाली होती. यानंतर शेख यांनी दि.०२ जुलै २०२१ रोजी  दुय्यम निबंधक कार्यालयाकडे या दस्ताच्या नकलांची अर्जाव्दारे मागणी केली. दुय्यम निबंधक कार्यालयाने शेख यांना दि.०२ जुलै रोजी याची पूर्तता ही केली. प्राप्त झालेल्या माहितीमध्ये या दस्तात  घोटाळा असल्याचं समोर आलं असल्याने असे किती प्रकार यापूर्वी घडले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

दस्तावेजात नेमका आक्षेप कुठे आणि कसा ? 

सदरचा खरेदी दस्ताचा नोंदणी क्रमांक ३७६६/२० असा असून हा दस्त ०९ जून २०२० रोजी तयार करण्यात आला. १० नोव्हेंबर २०२० रोजी प्रत्यक्षात याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करण्यात आली. दस्तामध्ये अरुण अर्जुन यादव यांनी रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांना गट.नं.२२१/२अ पैकी ०.०२ हे.आर.क्षेत्राची खरेदी दिली.त्यानुसार सातबारा वरती रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांच्या नावाची नोंद फेरफार क्रमांक १४५७१ नुसार लावण्यात आली.तत्पूर्वी खरेदी खत करण्यासाठी दस्ता सोबत सादर करण्यात आलेल्या सात बारा उतारा मध्ये खरेदी होण्यापूर्वीच रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांच्या नावाचा ०.०२ हे.आर. क्षेत्रासह उल्लेख करण्यात आला असून त्यास फेरफार क्रमांक १३०८८ चा संदर्भ आहे.त्यामुळे खरेदी प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच सादर करण्यात आलेल्या सात बारा मध्ये रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांच्या नावाचा उल्लेख कसा झाला असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक पाहता फेरफार क्रमांक १३०८८ ची तपासणी केली असता या फेरफार मध्ये रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांच्या नावाचा कोठेही उल्लेख नाही.या फेरफारमध्ये लिहून देणार म्हणून नितीन मारुती राऊत व लिहून घेणार म्हणून सुनिल नामदेव बनसोडे यांचा उल्लेख आहे.त्यामुळे ज्या फेरफार क्रमांकाच्या संदर्भासह दस्ता सोबत सात बारा प्रत सादर करण्यात आली त्यामध्ये रघुनाथ ज्ञानदेव बनसोडे यांचा नाम उल्लेख कसा झाला आणि कोणी केला असा ही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या सात बारा संदर्भात तलाठी सचिन करगळ यांच्याशी  संवाद साधला असता ते म्हणाले की, दस्तासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांशी आमचा कोणताही संबंध नाही.दुय्यम निबंधक कार्यालयाकडून खरेदी प्रक्रीया पार पडल्यानंतर मला कार्यालयीन आदेशान्वये जी  माहिती प्राप्त झाली त्यानुसार बनसोडे यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. 

या सर्व प्रकाराने अनेक प्रश्न उपस्थित होत असून इंदापूर मध्ये असे बनावट सात बारे तयार करुन खरेदी प्रक्रिया पार पाडल्या जात असल्याचा हा प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने बनावट सात बारा,इतर कागदपत्रे कोण तयार करतो,किती जणांची टोळी यात सामील आहे.अशा पद्धतीने किती खरेदी प्रकरणे करण्यात आली.हे सर्व प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे पडले असून महसूल विभाग या प्रकरणाच्या मुळाशी जाणार का? यात कोणाकोणाचे हात रंगले हे शोधणार का ? बनावट कागदपत्रे सादर करुन दस्तावेज बनवणाऱ्या टोळीवर कोणती कारवाई करणार याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

चौकट:

 *सात बारा व इतर कागदपत्रे तपासणी करुन प्राप्त अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवला जाईल..पी.जी.काटवटे,दुय्यम निबंधक इंदापूर* 

सदर प्रकरणी दस्ताशी संबंधित असणारे सर्व पक्षकार यांना नोंदणी अधिनियम १९०७ चे ८२ नुसार कारवाई करण्यात येईल.दस्तासोबत सादर करण्यात आलेला सात बारा व इतर कागदपत्रे तपासणी करुन प्राप्त अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवला जाईल. जे दोशी आढळतील त्यांवर शासनाकडून निश्चित कारवाई केली जाईल. - पी.जी.काटवटे,दुय्यम निबंधक इंदापूर 



 *दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणक खाजगी व्यक्ती हाताळत असल्याचा वसीम शेख यांचाआरोप ....* 

पत्रकार परिषदेमध्ये वसिम शेख यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात नेमणूकीस असलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त प्रदीप शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी जावून संगणक हाताळत असल्याची चित्रफित दाखवली आणि शिंदे यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला. त्यावर दुय्यम निबंधक पी.जी.काटवटे म्हणाले,की काही काळासाठी संगणकाचा बिघाड झाल्याने शिंदे यांना दुरुस्तीसाठी बोलावले होते. 
याबाबत प्रदीप शिंदे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता सदर चित्रफित मध्ये छेडछाड केली आहे यावर माझा बोलण्याचा प्रश्नच येत नाही,मात्र वसिम शेख यांनी मागवलेल्या माहिती अधिकारात प्रदीप शिंदे हे तिथे असल्याचा खुलासा दुय्यम निबंधक कार्यालयाने केला आहे.
close