आळंदी:-पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून आळंदी-चाकण घाटातील रस्त्यावर रिक्षा चालकांकडून पैसे घेणा-या दोघांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि. 30) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
महिंद्र पांडुरंग झोंबाडे (वय 35, रा. चाकण, आगरकरवाडी) व चंद्रकांत वामन कांबळे (वय 36, रा. चाकण, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मच्छिंद्र पोपट भांबरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी आळंदी-चाकण घाटातील रस्त्यावर पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून रिक्षा चालकांना थांबवत त्यांची कागदपत्रे चेक करत. तसेच तुमच्यावर कारवाई करतो असे म्हणून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.


