पर्यावरण विषय विस्ताराने पाहता समाजातील स्त्री-पुरुषांचे प्रमाण हे समसमान असावे असे तत्व आहे. तथापि जगामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आल्यानंतर याबाबत विविध कायदेही करण्यात आले. १९९१ साली एकहजार मुलांमागे ९४५ मुली असे प्रमाण आढळून आले .१९९० साली मिसिंग वुमेन या नावाने लिहिलेल्या शोधनिबंधात स्त्रियांच्या बाबत असलेली असमानता आणि त्याकडे होत असलेले दुर्लक्ष हा मुद्दा विचारात आला . स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येतील असमानता याचे प्रमुख कारण स्त्रीभ्रूणहत्या आहे अशीही चर्चा समोर आली.
वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षण या माध्यमातून भ्रूण हत्या थांबविण्यासाठी काहीतरी करता येईल या उद्देशाने २०१८ साल अत्यंत महत्त्वाचे ठरले.
भारतीय प्रशासन सेवेतील एक वरिष्ठ आय.ए.एस. अधिकारी श्री विकासजी खारगे यांनी या कामी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून कन्या समृद्धी योजना अमलात आणली. मुलगी जन्माला आल्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून त्या मुलीच्या स्वागताच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये दहा वृक्षांची लागवड शासनाच्या खर्चाने करावी. या दहा रोपांमध्ये पाच रोपे सागाची आणि पाच फळझाडे असावीत. जेणेकरून मुलीच्या जन्माच्या वेळी लावलेली झाडे, त्याची फळे चार-पाच वर्षात खायला मिळतील, फळे विक्रीतून अर्थिक फायदा होईल.
प्राथमिक शिक्षणाच्या खर्चाला हातभार लागेल हा उद्देश होता. ही योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आली. सागाची पाच, आंब्याची दोन, एक फणस, एक जांभूळ, एक चिंच, अशी भौगोलिक परिस्थितीनुसार उपयुक्त फळझाडे विनामूल्य वाटप करण्यात आली. रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकडून या रोपांच्या लागवडीची नोंद घेणे, संगोपन करणे अशा प्रकारची कामे करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल साधण्याचे महान कार्य तर झालेच शिवाय मुलगी घरात जन्माला आल्यानंतर तिच्या स्वागताच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संस्कार शासनाच्या माध्यमातून समाजापुढे मांडला गेला.
यातून असे दिसून आले की,
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

