Commiphora weightli. Syn-Commiphora mukul
पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्र वनाचा विचार केल्यास धनु राशीत मूळ नक्षत्राचा आराध्यवृक्ष वृक्ष देवधूप हा आहे.
मूळचा राजस्थान, सिंध, कच्छ, अरबस्तान, आफ्रिका या भागातील हा वृक्ष असला तरी वऱ्हाड, मैसूर, पूर्व बंगाल, आसाम या भागातही हा वृक्ष आढळतो.
देवधूपाचा गुग्गुळवृक्ष दीड ते दोन मीटर उंचीचा असतो. हा लहानसा आणि काटेरी असतो. फुले तांबडी पाच पाकळ्यांची असतात. पाने कडुलिंबाच्या पानासारखी संयुक्त असतात. फळे गोल लाल रंगाची असतात. या झाडाच्या डिंकास निर्यास असे म्हणतात. यामध्ये रेझीन आणि डिंक एकत्रच असतात. हा धूप पाण्यात टाकला की पाणी पांढरे होते. उष्णतेने म्हणजे सूर्य किरणांनी तापल्यामुळे गुग्गुळाच्या झाडापासून डिंक बाहेर पडायला लागतो व हिवाळ्यामध्ये तो घट्ट होतो तेव्हा तो काढला जातो. औषधांमध्ये महत्त्वाची भूमिका ही गुग्गुळाची असते.
हा छोटासा वृक्ष शेतकऱ्यांनी बांधावर, कुंपणाला, पडीक जमिनीवर लावला तरी तो चांगला येतो. कारण त्याला पाणी कमी लागते व ४५ अंश उष्णतामान देखील तो सहन करू शकतो. कफ, पित्त, वात हे तिन्ही दोष थांबतात. संधिवात, आमवात, मुळव्याध यावर याचा लेप लावतात. घरातील दुर्गंधी आणि कीटक यांचा नाश करण्यासाठी याचा तुपात वापर करतात. पोटात घेतल्यास रक्तवाहिन्यांना बळकटी येते. अर्धांगवात असणाऱ्यांना गुग्गुळ हे फार चांगले औषध आहे. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी त्रिफळाच्या काढ्याबरोबर गूग्गुळ घ्यावा. तोंड येऊन जखम झाली असेल तर तोंडामध्ये गुग्गुळ लावा.
हृदयरोग, पांडुरोग, पांढऱ्या पेशी, मुतखडा, लघवीचे आजार, श्वेतप्रदर, शुक्र दौर्बल्य अशा विविध आजारावर गुग्गुळ उपयोगी आहे. मात्र गुग्गुळाचे सेवन चालू असताना मद्यपान, आंबटगोष्टी खाणे, मैथुन, रागावणे या गोष्टी टाळाव्या लागतात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!

