shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(८३), राळवृक्ष-धूप


Canarium strictum (black dammer)
 पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता धनु राशीत मूळनक्षत्राचा आराध्य वृक्ष राळवृक्ष (धूप) हा आहे.  

पश्चिम घाटामध्ये सदाहरित व निम सदाहरित वनामध्ये सरासरी पंचवीसशे ते तीन हजार मिलिमीटर पावसाच्या प्रदेशात येणारा हा वृक्ष आकाराने मोठा असतो व याचे खोड गोलाकार सरळ वाढते. खोडाचा रंग पांढरट करडा असतो.सदाहरित व निम सदाहरित वनामध्ये नदी-नाल्यांच्या शेजारी उत्तम निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीवर हा वृक्ष येतो.पावसाळ्यामध्ये जमिनीवर पडलेला पालापाचोळा ओला होऊन तो सडतो व त्यापासून ह्यूमस तयार होते. ह्यूमस मधील सुपीकता व पाणी यामुळे हा वृक्ष सूर्यप्रकाशात उत्तम वाढतो.

या वृक्षाची साल करड्या रंगाची खडबडीत आणि खोडापासून आपोआप बाजूला निघणारी असते. सालीचा काप घेतला असता मिळणाऱ्या काळ्या रंगाच्या डिंकाला ब्लॅक डामर असे म्हणतात.
 या वृक्षाची पाने चकाकणारी आणि पिवळ्या रंगाची असतात व नंतर किरमिजी रंगाची होतात. पानावर लव असते व पानाच्या कडा करवतीच्या दाताप्रमाणे असतात.

या झाडाची फुले पिवळ्या रंगाची असतात व ती जानेवारी ते मार्च या काळात येतात
या वृक्षाची फळे अडीच ते पाच सेंटीमीटर लांबीची असतात . फळे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये तयार होतात. या झाडाच्या लाकडाचा उपयोग फारसा होत नाही कारण हे लाकूड टिकाऊ नसते. याचा डींक काढण्याची पद्धत विचित्र आहे. झाडाचे खोडानजीकचा काही भाग तोडून त्याठिकाणी भांडे ठेवतात आणि खालून जाळ करतात. यामध्ये वृक्षाला खूप त्रास होतो. त्यापासून धूप मिळतो. हा डींक/धूप जाळला असता वातावरण प्रसन्न होते आणि घरातील विषाणू डास नाहिसे होतात. याचा वास उग्र असतो.

 त्याच्या उदबत्त्या बनवतात. अंगदुखी, कंबरदुखीवर ऊदमिश्रीत केलेले तेल लावावे तसेच घरामध्ये उदाची धुरी घ्यावी.वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close