Sapindus emarginatus
पर्यावरण जनजागरणाचा दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केला असता कन्या राशीतील हस्त नक्षत्राचा पर्यायी वृक्ष रिठा/ अरिष्ट या नावाचा आहे.
रिठा या वृक्षाचे इंग्रजीतील नाव सोपनट Soapnut असेही आहे. हा वृक्ष सदाहरित तसेच पर्णझडीच्या वनातही आढळतो. रीठा वृक्ष सुमारे २५ ते ३५ फूट उंचीपर्यंत वाढतो. याची पाने तीन दलाची, दोन दलाची किंवा सहा दलाचीदेखील असतात. साधारणपणे सरासरी पाचशे मिली ते अडीचशे मिलिमीटर पर्जन्यमानाच्या क्षेत्रांमध्ये १६ ते ४० सेंटिग्रेड तपमानात तसेच चांगल्या प्रकारच्या निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये हा वृक्ष चांगला फोफावतो.
याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फळे येतात. याची साल ही राखाडी रंगाची काळपट आणि चमकणारी असते आणि लाकूड हे पिवळ्या रंगाचे कठीण असते.याची फळे मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये येतात. त्याच्यावर तीन रेषा असतात. फळात बी काळे गोलसर असते. या बियांमध्ये ३० टक्केपर्यंत तेल मिळते. फळांचे टरफल म्हणजे सालापासून शाम्पू बनवतात. कपडे धुण्यासाठी सोने चांदी पॉलिश करण्यासाठी रिठ्याच्या फळांच्या सालाचा उपयोग सर्रास केला जातो.
रिठ्याचे औषधी गुणधर्म बहुमोल आहेत. शरीरातील कफ, पित्त, वात हे त्रिदोष कमी करण्यासाठी याचा फेस अंगाला लावतात.छातीला फेस चोळू नये.जर छातीमध्ये कप दाटला असेल तर त्याची साल अत्यल्प प्रमाणात पोटात घ्यावी. ओकारी येण्यासाठीदेखील सालीचा वापर केला जातो. म्हणजे शरीरातील पित्त बाहेर पाडायचे असेल तर पोटात घेतात तसेच शरीरामध्ये विष गेले असेल तर ते ओकारीवाटे बाहेर काढण्यासाठी रिठ्याचे सालीचा वापर करतात.
गंभीर ताप आलेला असेल किंवा उन्हातून फिरून आल्यावर पायाच्या तळपायांची आग होत असेल तेव्हा त्याच्या साली पाण्यात भिजवून त्याचा फेस करून तो तळपायांना चोळावा. तसेच तापामध्ये कपाळावर लावावा. हातापायांना चोळावा. विंचूदंशावर, मधमाशी, गोम यांच्या दंशावर रिठ्याचा फेस लावल्यास आराम मिळतो. जखमा धुण्यासाठी देखील रिठ्याचा फेस वापरतात. तसेच मानसिक संतुलन बिघडले असेल तर त्याच्या फेसाचा वास दिला तर उपयोग होतो. उष्णतेने अंगावर लाल चट्टे आलेले असतील, गजकर्णाचे चट्टे/नायटे असतील तर फेस चोळावा.काही नद्या या साबणामुळे विषारी होत आहेत.
त्यावर पर्याय म्हणून रिठ्याचाफेस वापरला तर केमीकलयुक्त साबणाचा वापर कमी होऊन नद्या शुद्ध होतील.वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

