नको नको रे ज्योतिषा
माह्या दारी नको येऊ,
माह्य दैव मले कळे
माह्या हात नको पाहू.
धनरेषांच्या च-यांनी
तळहात रे फाटला,
देवा तुह्याबी घरचा
झरा धनाचा आटला.
नशिबाचे नऊ ग्रह
तळहाताच्या रेघोट्या,
बापा नको मारू थापा
अशा उगा ख-या खोट्या.
-बहिणाबाई.
या निरक्षर-अशिक्षित माऊलीने दारी आलेल्या ज्योतिषाला सुमारे १०० वर्षांपूर्वी हे खणखणीत सत्य सोप्या पण परखड भाषेत सुनावलं.
डोके(बुध्दी नाही म्हणत)गहाण ठेवून भविष्यादि अंधश्रध्दांपुढे सपशेल शरणागती पत्करणारी आजची तथाकथित थोर उच्चविद्याविभूषित माणसे बघतांना या माऊलीची थोरवी लख्ख होऊन समोर येते.
या माउलीने शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेली खंत आजही कायम आहे.

