शिर्डी । प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०९ ऑगस्ट ते सोमवार दिनांक १६ ऑगस्ट २०२१ याकालावधीत कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आभासी (Virtual) पध्दतीने साजरे करण्यात येणा-या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.
आज सकाळी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची समाधी मंदिरातून गुरुस्थान व व्दारकामाई मार्गे स्टेजपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी विणा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा व मंदिर पुजारी दिगंबर कुलकर्णी यांनी कलश घेवून सहभाग घेतला.
यावेळी संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करुन श्री साईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला.
मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी व दिंगबर पुजारी यांच्यामार्फत सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत श्री साईसच्चरिताचे ०१ ते ०७ अध्यायांचे वाचन करण्यात आले.

