shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (६२):वेळू / बांबू...!!

पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्र वनाचा विचार केला असता मिथून ही तिसरी राशी असून त्याचे नक्षत्र पुनर्वसू असे असून आराध्यवृक्ष हा वेळू/बांबू  (Dendrocalamus strictus) आहे. पुनर्वसू नक्षत्राचे तीन चरण मिथून राशीत तर शेवटचा चरण कर्क राशीत येतो. याला इंग्रजीत पोलक्स असे म्हणतात. वेळू म्हणजेच बांबू हा समुद्रसपाटीपासून ४००० मीटर उंचीपर्यंत आढळतो. याच्या एकूण १५१ प्रजाती असून भारतात १२० प्रजाती आढळतात. 

ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात बांबूचे महत्व फार असून याला संस्कृतमध्ये वंश असेही म्हणतात. बाबूची उत्पत्ती ही त्याच्या  कंदातून फुटणाऱ्या कोंबापासून होते. हे कोंब औषधी असतात. बांबूचे कोंब बालपणी खाल्ले की उंची वाढते असं म्हणतात. बांबू हे गवत प्रजाती मधील झाड आहे. उष्ण आणि दमट हवेत बांबूची वाढ चांगली होते मात्र वजा पाच पासून कमाल शेहचाळीस सेंटीग्रेड तापमानापर्यंतच्या क्षेत्रात बांबू आढळतो. बाबूसाठी ७५० मिलिमीटर ते ५००० मिलिमीटर पर्जन्यमान आवश्यक असते. मात्र उत्तम प्रतीच्या काळ्या जमिनीमध्ये बांबू वाढत नाही. बांबूला निचरा होणारी मुरमाड माती उत्तम असते. बांबूला आयुष्यात एकदाच फुलोरा येतो आणि त्यावेळेस त्याला बी येते नंतर बांबू मरतो. बांबूचा फुलोरा येण्याचा कालावधी हा बत्तीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत त्याच्या जातीनुसार असतो. 
बांबूचे कंद असतात आणि यातून बांबूचे नवीन रोप तयार होते. या रोपास / कंदास डुकरे ,साळिंदर, उंदीर, माकडे, खातात. बांबूची पाने शेळ्या, गुरे खातात. याशिवाय मुंग्या आणि बुरशीपासून बांबूला धोका असतो. 

बांबू हे नगदी पीक आहे. बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय आहे. कागद तयार करण्यासाठी मानवेल जातीचा बांबू वापरतात. इमारतींचे बांधकाम,मंडप उभारणी, उदबत्ती, आईसकांडी, पतंग, फर्निचर, शेतीची अवजारे, शेतीत वेलींना आधार देण्यासाठी बांबूचा वापर करतात. बांबूच्या कोंबाचे औषधी गुणधर्म आहेत. त्याचे लोणचेही बनवले जाते. बांबूमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होतो. पर्यावरणाचे रक्षण होते. बांबू  कफ, रक्तविकार, सूज यावर उपयुक्त आहे.

बांबूच्या काही महत्त्वाच्या प्रजाती. यामध्ये १)लांब व भरीव बांबू २) पिवळा बांबू ३)कागदी बांबू ४)मलींग बांबू ५)भालुका बांबू ६) कटांग बांबू ७) जती बांबू ८)जामा वेतू बांबू ९) मोकल बांबू १०)मुळी बांबू ११) निगल बांबू १२) बाजल बांबू १३) हुडा किंवा मंगा बांबू १४) बिजली बांबू १५) माणगा बांबू अशा जाती विशेषत्वाने आढळतात.वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
#कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत…!!

close